गर्दीत होते रुग्णवाहिकेची कोंडी, रुग्णाचा गुदमरतो श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:08 AM2021-01-21T04:08:23+5:302021-01-21T04:08:23+5:30
- दंड तर दूरच साधी शिक्षाही नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रुग्णवाहिका अर्थात रुग्णाला तात्काळ उपचार केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी ...
- दंड तर दूरच साधी शिक्षाही नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णवाहिका अर्थात रुग्णाला तात्काळ उपचार केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी निर्माण करण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची व्यवस्था. मात्र, या व्यवस्थेला गंतव्य स्थानापर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक दिव्य पार करावे लागतात. अनेकदा अडथळे पार करताना होत असलेल्या समयगच्छंतीमुळे रुग्णाचा श्वास गुदमरतो आणि तो इहलोकीला रामराम ठोकून परलोकी जातो. या सगळ्याचे प्रमुख कारण आहे ते रहदारीतील कोंडी. कुणाच्या घरात रुग्णच नाहीत आणि त्यांना कधी इस्पितळाची पायरी चढावीच लागली नाही, असे वर्तमान काळात तरी अशक्य आहे. अटीतटीच्या प्रसंगी तर रुग्णवाहिकेशिवाय पर्यायच नसतो. मात्र, गांभीर्याची जाणीव नसल्याने अनेक महाभाग रुग्णवाहिकेची वाट अनावधानानेच म्हणा रोखून धरत असतात. असा प्रसंग आपल्यासोबतही घडला तर तुम्हाला कसे वाटणार, याचे संशोधन आणि त्यावरील उपाय आपल्यालाच शोधायचे आहे.
राज्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान रस्ते सुरक्षा अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत पोलीस यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांकडून रस्ता सुरक्षेबाबत विविध उपक्रमातून जनजागृती केली जात आहे. रुग्णवाहिकेबाबतही याच अभियानात मार्गदर्शन केले जात आहे. मात्र, या कानातून त्या कानात गेले वारे... अशी स्थिती सर्वसामान्यांची आहे.
रुग्णवाहिकेस अडथळा, दंड एकालाही नाही
केवळ रुग्णवाहिकेस अडथळा निर्माण केला म्हणून दंड ठोठावल्याच्या प्रकरणाची नागपूर पोलिसांकडे नोंद नाही. रस्ता नियमाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणातच अशा दंडाचा समावेश आहे. रुग्णवाहिकेस रस्ता मोकळा करण्याबाबत अनेक माध्यमातून नागरिकांच्या जाणिवा बळकट झाल्या असल्याने दंड ठोठावण्याची वेळ नागपुरात तरी आलेली दिसत नाही. ही चांगली बाब असून नागरिकांनी याबाबत आणखी सजग होण्याची गरज आहे.
रुग्णवाहिकेसाठी सिग्नलवर स्पेस असावी
नागपूर हे मध्य भारताचे अतिमहत्त्वाचे क्षेत्र असल्याने आणि वैद्यकीय सेवांचे हब असल्याने रुग्णांचे आवागमन मोठ्या प्रमाणात होते. दर पाच मिनिटात कोणत्या ना कोणत्या चौकातून रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज येत असतो. ही गोष्ट ध्यानात घेऊन प्रशासनाने प्रत्येक चौकात सिग्नलवर रुग्णवाहिकेच्या आवागमनासाठी विशेष स्पेस निर्माण करण्याची गरज आहे आणि रुग्णवाहिका दिसताच इतर वाहनांना थांबण्याचा कायदा करणे गरजेचे आहे.
१० हजार दंड आणि तीन महिने कारावास
रुग्णवाहिका किंवा इतर कुठल्याही आपात्कालीन वाहनाचा रस्ता अडविल्यास १० हजार रुपये दंड किंवा तीन महिन्याचा कारावास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. मात्र, पोलिसांकडून यासंबंधात कठोर कारवाई होत नसल्याने नागरिक अनभिज्ञ आहेत. जोवर कारवाई होत नाही तोवर नागरिकही बेफाम असतात, हा अघोषित नियमच आहे.
* सिग्नल हातावर घेऊन सोडवावी लागते कोंडी
- नागपुरात मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि नजीकच्या जिल्ह्यातून रुग्ण रुग्णवाहिकेतून येतात. शहरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते. बरेचदा नागरिक स्वत:हून रस्ता सोडतात. मोठ्या गाड्या आडव्या आल्या तरच समस्या निर्माण होते. अशावेळी निर्माण झालेल्या कोंडीतून रुग्णवाहिकेला सोडविण्यासाठी हाताने सिग्नल सांगून रस्ता मोकळा करून द्यावा लागतो आणि पुढे वॉकीटॉकीवर संदेश प्रसारित करून पुढच्या सर्व सिग्नलवरील पोलिसांना रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या जातात. रुग्णवाहिका प्राधान्यक्रमात असल्याने कुठलीही तडजोड केली जात नाही.
- जागवेंद्रसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक (वाहतूक - सदर शाखा)
* अडथळ्यांशिवाय रस्ता पारच होत नाही
रुग्णवाहिकेतून रुग्णाला इस्पितळापर्यंत पोहोचविताना अनेक अडथळ्यांचे दिव्य पार करावे लागते. पोलीस असतील तर गर्दीला दूर सारण्याचे प्रयत्न करतात. मात्र, तेवढाही वेळ आमच्याकडे नसतो. अनेकदा लोक सहकार्य करतात तर अनेकदा नागरिक सायरनकडे दुर्लक्ष करताना दिसतात. रुग्णवाहिकेत कुणाचा जीव टांगणीला लागला आहे, याची जाणच अनेकांना नसते. बरेचदा तर काही नागरिक तोंडही वाजवतात.
- मंगेश बडे, रुग्णवाहिका चालक
............