जिल्हा न्यायालयापुढे पार्किंग नियमांची होते धुळधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:08 AM2021-09-19T04:08:18+5:302021-09-19T04:08:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सर्वसामान्यांच्या समस्यांची जातीने दखल घेणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या परिसरातच पार्किंग नियमांची धुळधाण होत असल्याचे चित्र ...

There was a flurry of parking rules before the district court | जिल्हा न्यायालयापुढे पार्किंग नियमांची होते धुळधाण

जिल्हा न्यायालयापुढे पार्किंग नियमांची होते धुळधाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सर्वसामान्यांच्या समस्यांची जातीने दखल घेणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या परिसरातच पार्किंग नियमांची धुळधाण होत असल्याचे चित्र आहे. आकाशवाणी चौकापासून विभागीय आयुक्तालयापर्यंत जाणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या बाजूच्या रस्त्यावरच रस्त्याच्या दुतर्फा चारचाकींची रांग लागलेली कायम दिसून येते. विशेष म्हणजे, वाहनांची ही अवैध पार्किंग करण्यात वकीलच पुढाकार घेत असल्याचे नजरेस पडते.

जिल्हा न्यायालयात विविध प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी दररोज हजारो लोक येत असतात. ही प्रकरणे हाताळणाऱ्या वकिलांचाही येथे मोठ्या प्रमाणात राबता असतो. याशिवाय, न्यायालयीन कामासाठी लागणारे स्टॅम्प पेपर, कोर्ट स्टॅम्प तिकिटे विक्री करणारे, नोटरीची कामे करणारे सर्व येथेच रस्त्यावर बसलेले दिसून येतात. या सर्वांची वाहने इतसस्त: लागलेली आढळून येतात. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या अवतीभवती सुरक्षा व अन्य कारणासाठी पोलीसही मोठ्या प्रमाणात असतात. मात्र, ट्राफिक पोलीस दिसून येत नाही. त्याचा लाभ अवैधरीत्या वाहनांची पार्किंग करणारे घेत असल्याचे दिसून येते.

नो पार्किंग बोर्डापुढेच लावली जातात वाहने

कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच असतो. त्या अनुषंगाने शहरातील रस्त्यांवर वाहने कुठे पार्क केली जावी आणि कुठे करू नये, याचे संकेत देणारे फलकही लावण्यात आले आहेत. जिल्हा न्यायालयाच्या परिसरात ‘नो पार्किंग’ असे ठळक दिसणारे फलक असताना, कायदा न्यायालयादेखत तोडण्यात येत असतो. या फलकाच्या बाजूलाच मोठ्या संख्येने वाहने अवैधरीत्या पार्क केलेली कधीही दिसून येतात.

कायद्याचे ज्ञान पाजळणारे वकीलच तोडतात नियम

इतरांना कायदा समजावून सांगणे व कायद्यातून पळवाट काढणे, या दोन्ही गोष्टींमध्ये वकील तरबेज असतात. बरेचदा कायद्यातील गफलत वकिलांच्याही अंगलट येत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. हेच वकील येथे सर्रास पार्किंग कायदा तोडताना दिसतात.

पार्किंगची व्यवस्था पुरेशी नाही

जिल्हा न्यायालय आणि विविध प्रकरणांचे विविध बेंच आणि त्यासाठी येणारे लोक, वकील, पोलीस यांची मोठीच गर्दी असते. न्यायालय परिसरात अशा सगळ्यांसाठी वाहन पार्किंगची सोय आहे. मात्र, या पार्किंग स्पेसमध्ये वाहने लावण्याची तसदी कोणीच घेताना दिसत नाही. कधी ही व्यवस्था तोकडी पडते तर कधी बरीच जागा रिकामी असते.

.............

Web Title: There was a flurry of parking rules before the district court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.