उपराजधानीत दोषसिद्धतेचे प्रमाण वाढले

By admin | Published: January 13, 2016 03:36 AM2016-01-13T03:36:31+5:302016-01-13T03:36:31+5:30

गुन्हेगारांना त्यांच्या पापाची शिक्षा देण्यासाठी शहर पोलिसांनी चालविलेल्या प्रयत्नांना चांगले यश येत आहे.

There was an increase in the number of culpability in the system | उपराजधानीत दोषसिद्धतेचे प्रमाण वाढले

उपराजधानीत दोषसिद्धतेचे प्रमाण वाढले

Next


२१७ पैकी ११५ गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा : राज्यभरात प्रशंसा
नरेश डोंगरे नागपूर
गुन्हेगारांना त्यांच्या पापाची शिक्षा देण्यासाठी शहर पोलिसांनी चालविलेल्या प्रयत्नांना चांगले यश येत आहे. डिसेंबर २०१५ मध्ये २१७ पैकी ११५ प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. गुन्हे (दोष) सिद्धतेचे (कन्व्हिक्शन रेटचे) हे प्रमाण ५३ टक्के आहे. मुख्यमंत्र्यांच्या होम टाऊनमधील दोषसिद्धतेची ही वाढलेली टक्केवारी राज्यभरात प्रशंसेचा विषय ठरली आहे. मध्यंतरी नागपूर क्राईम कॅपिटल झाल्याची आणि येथे गुन्हेगारी उफाळल्याची जोरदार ओरड आणि आरोप होत होता.
पोलिसांकडून २०१४ आणि २०१५ मध्ये घडलेल्या गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी सादर केली जात होती. या आकडेवारीचा पुरावा देऊन नागपुरात गुन्हेगारी कमी झाल्याचाही दावा पोलीस अधिकारी करीत होते. मात्र या दाव्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच गुन्हेगारी वाढल्याच्या आरोपाचे खंडन केले. एवढेच नव्हे तर ‘माझ्यावर वाट्टेल ते आरोप करा. परंतु माझ्या शहराला बदनाम करू नका’, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले होते.
हे सर्व सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आणि गुन्हे (दोष) सिद्धतेचे प्रमाण वाढवण्याचेही पोलिसांना खणखणीत आदेश दिले होते. गुन्हेगारांवर कडक कारवाई करताना कुणाची गय करू नका, असे म्हणत आपण तुमच्या (पोलिसांच्या) पाठीशी उभे आहोत, असेही स्पष्ट संकेत पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते. त्यावरून नागपूर पोलिसांनी खतरनाक गुन्हेगारांवर तडीपारी, स्थानबद्धता (एमपीडीए), मोक्कासारख्या कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यातून खून, खुनाचे प्रयत्न, घरफोड्या आणि अन्य काही प्रमुख गुन्ह्यांची आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली.
हे करतानाच दुसरीकडे शीर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे करणाऱ्या आरोपींना शिक्षा कशी होईल, त्याकडेही कटाक्षाने लक्ष पुरविणे सुरू केले. गुन्हा घडल्यानंतर थातूरमातूर पद्धतीने तपास करून, पुरावे गोळा करून आणि प्रकरण न्यायप्रविष्ट करून आपली जबाबदारी संपल्यासारखे वागायचे नाही, तर, गुन्ह्यांची सूक्ष्म माहिती गोळा करून गुन्हेगाराविरुद्ध भक्कम पुरावे जमा करण्यावर भर देण्याविषयीचे निर्देश प्रत्येक अधिकाऱ्यांना देण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुराव्याची साखळी जोडायची आणि सुनावणीच्या वेळी न्यायालयात संबंधित गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी युक्तिवाद कसा होईल, त्याची काळजी घेण्यावरही जोर देण्यात आला. त्याचे चांगले परिणाम समोर आले आहे.

वाढता वाढता वाढे टक्केवारी
जानेवारी २०१५ मध्ये दोषसिद्धतेचे प्रमाण केवळ १० टक्के होते. फेब्रुवारीत ९ आणि मार्च मध्ये हे प्रमाण ९ तसेच ७ टक्क्यावर आले. एप्रिल १५ टक्के, मे ५ टक्के, जून १५ आणि जुलै ११ टक्के कन्व्हीक्शन रेट असताना सप्टेंबर २०१५ मध्ये कन्व्हीक्शन रेट घसरून ४ टक्क्याांवर आला. त्याची गंभीर दखल घेत कन्व्हीक्शन रेट वाढवण्यासंबंधी आवश्यक त्या सर्व उपाययोजना हाती घेण्यात आल्या. परिणामी आॅक्टोबर २०१५ पासून कन्व्हीक्शन रेट वाढण्यास मदत झाली. आॅक्टोबरमध्ये कन्व्हीक्शन रेट १४ टक्के झाला. नोव्हेंबरमध्ये १४५ प्रकरणातील ३४ प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा झाल्याने हे प्रमाण २३ टक्क्यांवर पोहचले. तर, डिसेंबर २०१५ मध्ये २१७ प्रकरणातील ११५ प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने ही टक्केवारी ५३ वर पोहचली आहे. वर्षभराची कन्व्हीक्शन रेटची सरासरी १६ टक्के आहे. अर्थात जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत निकाली निघालेल्या १९०६ प्रकरणातील २९७ प्रकरणातील गुन्हेगारांना त्यांच्या पापाचे फळ मिळाले आहे.
पोलीस आयुक्त म्हणतात...
या संदर्भात पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांची प्रतिक्रिया नम्र तेवढीच बोलकी आहे. आपण सर्वाच्या सहकार्यामुळे गुन्हेगारांविरुद्ध पुरावे गोळा करण्यास मदत होत आहे. अशीच मदत झाल्यास भविष्यात १०० पैकी शंभरही प्रकरणातील गुन्हेगारांना कडक शिक्षा होईल, असा आपला विश्वास आहे, असे पोलीस आयुक्त यादव म्हणतात.

Web Title: There was an increase in the number of culpability in the system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.