लेंड्रापार्क रामदासपेठेत ‘तो’ दरोडा पडलाच नाही
By admin | Published: October 23, 2016 02:43 AM2016-10-23T02:43:50+5:302016-10-23T02:43:50+5:30
लेंड्रापार्क न्यू रामदासपेठ येथे तीन वर्षांपूर्वी दरोड्याची घटनाच घडलेली नाही. भारती बेलसरे यांची विजय तालेवार आणि साथीदारांविरुद्धची तक्रार खोटी आहे,
बेलसरे यांची तालेवारविरुद्धची तक्रार खोटी : न्यायालयात ‘ब’ फायनल अहवाल दाखल
नागपूर : लेंड्रापार्क न्यू रामदासपेठ येथे तीन वर्षांपूर्वी दरोड्याची घटनाच घडलेली नाही. भारती बेलसरे यांची विजय तालेवार आणि साथीदारांविरुद्धची तक्रार खोटी आहे, असा निष्कर्ष काढून या प्रकरणाचे तपास अधिकारी सीताबर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी. बी. काटकर यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी फुलझेले यांच्या न्यायालयात ‘ब’ फायनल अहवाल दाखल केला आहे.
भारती दिलीप बेलसरे यांच्या तक्रारीनुसार २४ मार्च २०१२ रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास विजय शंकर तालेवार हे आपल्या साथीदारांच्या मदतीने बेलसरे यांच्या घरात घुसले होते. मारहाण करीत त्यांनी बेलसरे आणि त्यांचे घरमालक रामनारायण मिश्रा यांचे सोन्याचे दागिने लुटून नेले होते. सीताबर्डी पोलिसांनी भादंविच्या २९४, ३२३, ३५४, ३९५, ४४८, ४५२ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी तालेवार यांनीही हल्ल्याची तक्रार केल्यावरून भारती बेलसरे, त्यांचा मुलगा, तसेच रामनारायण मिश्रा, आणखी दोन मुले, अन्य सात-आठ जणांविरुद्ध भादंविच्या १४३, १४७,१४८, १४९, २९४, ५०६ (ब), ३२६ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी भारती बेलसरे आणि त्यांच्या मुलाला तात्काळ अटक केली होती. २५ मार्च २०१२ रोजी न्यायालयात जामीन होऊन त्या घरी गेल्या असता त्यांना तालेवार यांनी घराचा ताबा घेऊन घरातील टीव्ही, फ्रीज आदी वस्तू बेपत्ता दिसल्या होत्या.त्यांनी दरोड्याची तक्रार सीताबर्डी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशावरून पुन्हा भादंविच्या ३९५, ४४८, १२० (ब), ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेलसरे यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करून सीताबर्डी पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेतला होता. ९ जुलै २०१३ दोन्ही गुन्ह्यांचा तपास राज्य सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. (प्रतिनिधी)