फक्त होती जगण्याची इच्छाशक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:08 AM2021-04-28T04:08:43+5:302021-04-28T04:08:43+5:30
अभय लांजेवार उमरेड : अचानक प्रकृती बिघडली. कोरोनाची लक्षणे दिसू लागली. कोरोना टेस्ट केली. पॉझिटिव्ह आली. अत्यंत गरीब आणि ...
अभय लांजेवार
उमरेड : अचानक प्रकृती बिघडली. कोरोनाची लक्षणे दिसू लागली. कोरोना टेस्ट केली. पॉझिटिव्ह आली. अत्यंत गरीब आणि हलाखीची परिस्थिती. ना हातात पैसा ना जवळ कुणी नातेवाईक. अशातच हितचिंतक मित्राला फोन केला. त्याने उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये औषधोपचाराचा सल्ला दिला. एचआरसीटी स्कोर होता २१ आणि ऑक्सिजन लेव्हल होती ६५. अशाही विपरीत परिस्थितीवर मात करीत मंगळवारी अड्याळवाले ले-आऊट येथील मारोती नामदेव वाघमारे (५७) हे कोरोनामुक्त होऊन घरी पोहोचले. त्यांच्या जगण्याच्या हिमतीमुळे आणि डॉक्टरच्या योग्य आणि अचूक औषधोपचारामुळेच ते घरी परतल्याने कुटुंबीय आनंदाने न्हाऊन निघाले.
मारोती वाघमारे यांचे भाजीपाला विक्रीचे छोटेसे दुकान आहे. अत्यंत मनमिळावू असलेले मारोतराव तापाने फणफणले. खोकला आणि अन्य त्रास सुरू झाला. लागलीच त्यांनी कोविड टेस्ट केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. कुटुंब धास्तावले. कशीबशी रकमेची जुळवाजुळव करीत नागपूर येथे सिटीस्कॅनसाठी नेण्याचा निर्णय झाला. नागपूरला प्रवास आणि सिटीस्कॅन असा संपूर्ण खर्च १७ हजार रुपयाचा आला.
सिटीस्कॅनमध्ये २१ स्कोर निघाला. मुलगा दीपक घाबरला. मेडिकलमध्ये नेले तर पाय ठेवायला जागा नाही. खासगी दवाखान्यासाठी पैसा नाही. अशातच आता वडिलांना घरीच क्वॉरंटाईन ठेवू. औषधोपचार करू, असा निर्णय पक्का करीत उमरेडच्या दिशेने निघाले. अर्ध्यावर प्रवासात असताना नगरसेवक सतीश चौधरी यांना परिस्थिती सांगितली. सतीश चौधरी यांनी त्यांना घरी न नेता उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये औषधोपचाराचा सल्ला दिला. डॉ. स्वप्निल सहारकर यांच्याशी संपर्क साधला. तातडीने अॅडमिट केल्या गेले. प्राणवायू मिळाला. औषधोपचार नियमित सुरू झाले. डॉ. सहारकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अनेकांनी हिंमत दिली. सोमवारपासून मारोती वाघमारे यांच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झाल्याने अखेर आज सुटी घेण्याचा निर्णय झाला. आता विना ऑक्सिजन त्यांची लेव्हल ९६ आली आहे.
--
पैसा अनेकांजवळ असला तरी बेड मिळत नाही. वेळीच ऑक्सिजनची सुविधाही नाही. व्हेंटिलेटर मिळण्यासाठीही बराच विलंब होतो. कोविड सेंटरमध्ये बाजूच्याच खाटेवरील माणस मरतात. तेव्हा आजूबाजूचे खचतात. अशाही विपरीत परिस्थितीत मारोती वाघमारे यांची हिंमत लाखमोलाचीच आहे.
सतीश चौधरी
नगरसेवक, नगरपालिका उमरेड
--
एकमेकांना हिंमत आणि आत्मविश्वास वाढविण्याचे काम आता सर्वांनी केले पाहिजे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर घाबरून जाऊ नये. योग्य काळजी. औषधोपचाराने बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आम्ही सर्वजण रुग्णांच्या सेवेत अविरत आहोतच.
डॉ. स्वप्निल सहारकर
वैद्यकीय अधिकारी, उमरेड
--