महाराष्ट्रावर वाङ्मय कृतीचा झेंडा रोवणारा गरीबच राहिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:45 AM2017-09-28T01:45:31+5:302017-09-28T01:45:43+5:30
राजकीय कादंबरीचा इतिहास लिहायचा झाल्यास त्याची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्यापासून होते. इंग्रजी व मराठी भाषेतून समर्थपणे लिहू शकणारे पत्रकार आणि भाष्यकार ते होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकीय कादंबरीचा इतिहास लिहायचा झाल्यास त्याची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्यापासून होते. इंग्रजी व मराठी भाषेतून समर्थपणे लिहू शकणारे पत्रकार आणि भाष्यकार ते होते. आपल्या लेखणीतून त्यांनी महाराष्ट्रात वाङ्मय कृतीचा झेंडा रोवला खरा, परंतु आयुष्यात हा माणूस गरीबच राहिला, अशी खंत लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरद्वारे अरुण साधू यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमात द्वादशीवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अरुण साधू यांच्यासंदर्भातील काही अनुभव आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत कथन केले.
कार्यक्रमाला वक्ता म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, ज्येष्ठ कथाकार व कादंबरीकार आशा बगे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते.
यावेळी आशा बगे यांनी अरुण साधू यांच्या मुखवटा कादंबरीवर भाष्य केले. या कादंबरीतून आणि त्यांच्या एकूण लेखनातून हा माणूस कसा संमिश्र व्यक्तिमत्त्वाचा होता याची अनुभूती करून दिली. त्यांच्या साहित्यकृतीला ज्ञानपीठ , साहित्य अकादमींचा पुरस्कार मिळायला हवा होता, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. यशवंत मनोहर यांनीही अरुण साधू यांच्या अष्टपैलू लेखणीबद्दल आणि भूमिकेबद्दल भाष्य केले. मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून नाराजी व्यक्त करणाºया या व्यक्तिमत्त्वाने संमेलनाच्या मंचावर राजकारण्यांना जास्त महत्त्व देत असाल तर मराठी साहित्यकार व श्रोत्यांनी जाऊच नये अशी भूमिका मांडली होती. निगर्वी, साधे, सरळ व प्रांजळ व्यक्तिमत्त्व असलेल्या साधू यांनी आपल्या लेखणीतून कुणाचीही पर्वा केली नसल्याचे मत डॉ. मनोहरांनी व्यक्त केले.
प्रसंगी डॉ. गिरीश गांधी यांनी संमेलनाच्या मंचावर झालेल्या मतभेदाचे कटु अनुभव सांगितले. परंतु त्यांनी तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रदीप विटाळकर यांनी केले.