राणे दाम्पत्याच्या नात्यात होता तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 11:49 PM2020-08-20T23:49:57+5:302020-08-20T23:51:17+5:30
पती आणि दोन्ही मुलांना ठार मारल्यानंतर स्वत: आत्महत्या करणाऱ्या डॉ. सुषमा राणे यांच्या प्रकरणात नवनवे तथ्य पुढे ते आहेत. राणे दाम्पत्याचे नातेसंबंध मागील अनेक दिवसांपासून ताणले गेले होते, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पती आणि दोन्ही मुलांना ठार मारल्यानंतर स्वत: आत्महत्या करणाऱ्या डॉ. सुषमा राणे यांच्या प्रकरणात नवनवे तथ्य पुढे ते आहेत. राणे दाम्पत्याचे नातेसंबंध मागील अनेक दिवसांपासून ताणले गेले होते, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे. सुषमाच्या मोबाईलवर येणारे प्रत्येक कॉल धीरजने आपल्या मोबाईलवर डायव्हर्ट करून ठेवले होते, यावरूनच त्यांच्या संबंधांमध्ये किती तणाव आला होता, हे लक्षात येते.
कोराडी मार्गावरील ओम नगर येथे राहणारे धीरज राणे (४०), त्यांची पत्नी सुषमा राणे (३९), अकरा वर्षीय मुलगा आणि मुलगी वन्या (५) हे सर्वजण आपल्या घरी मृतावस्थेत आढळले होते. सुषमा फासावर लटकलेली होती तर अन्य तिघेही बिछान्यावर मृत पडले होते. प्राथमिक तपासामध्ये ही सामूहिक आत्महत्या असल्याची बाब पुढे आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरणाचा तपास आरंभला आहे. एकाच वेळी चार जणांचा मृत्यू होण्याच्या या घटनेने पोलीस अत्यंत गंभीरपणे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आतापर्यंतच्या तपासात चक्रावून टाकणारी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च मध्यमवर्गीय असलेल्या राणे दाम्पत्याचे आयुष्य मागील काही दिवसापासून वाईट चालले होते. त्यांच्यासोबत त्यांची आत्याही राहात होती. शेजारीच नातेवाईकही राहतात. आपल्या नात्यातील ताणतणाव मुलांच्या आणि आत्याच्या लक्षात येऊ नये यासाठी बरेचदा ते कारमध्ये बसून दीर्घ चर्चा आणि वादविवाद करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या संदर्भात त्यांच्या आत्याला आणि नातेवाईकांनाही कल्पना होती. मात्र कुणीही हे फारसे मनावर घेतले नाही.
मागील काही दिवसांपासून धीरजचा स्वभाव शंकेखोर झाला होता. त्याने सुषमाच्या मोबाईलवर येणारे कॉल आपल्या मोबाईलवर डायव्हर्ट करून ठेवले होते. यामुळे सुषमाला आलेले कॉल आधी धीरजला जायचे. डॉक्टर असल्याने सुषमाला अनेक लोकांचे कॉल यायचे. धीरजने कॉल रिसिव्ह केल्यावर पलिकडील व्यक्तींना आश्चर्य वाटायचे. या संदर्भात कुण्या व्यक्तीने सुषमाला विचारणा केली तर, आपण डॉक्टर असल्याने व अधिक व्यस्त राहात असल्याचे कारण सांगून ती वेळ मारून नेत असे. धीरजला बºयाच दिवसापासून दारूचे व्यसन लागले होते. अलिकडे त्याचे मद्यपान अधिकच वाढले होते. दारूच्या नशेत तो झिंगून जायचा. सोमवारच्या रात्रीही तो असाच झिंगलेल्या अवस्थेत घरी आला होता. त्याने जेवणही केले नव्हते. यानंंतरच सुषमाला या हत्याकांडाची युक्ती सुचली असावी, असा अंदाज आहे. या योजनेनुसार, मंगळवारी सकाळी दवाखान्यातून येताना ती अॅनेस्थेशियाचे औषध सोबत घेऊन आली. त्या वेळी तिने मुलीलाही सोबत नेले होते. दवाखान्यातून परतल्यावर पतीला आणि मुलाला तिने आधी इन्जेक्शन दिले असावे. त्यानंतर मुलीला देऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.