तेथे सर्व १५ सीसीटीव्ही कार्यरत होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:50 AM2019-03-29T00:50:34+5:302019-03-29T00:51:18+5:30
नाना पटोले यांच्या आरोपासंदर्भात नागपूर लोकसभा मतदार संघांतर्गत असलेल्या मध्य नागपूर मतदार संघातील सहा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीसुद्धा आपला अहवाल सादर केला असून, त्या दिवशी सर्वच्यासर्व १५ सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. २५ मार्च ते २७ मार्च या कालावधीतील संपूर्ण रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याने, या तक्रारीत तथ्य नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाना पटोले यांच्या आरोपासंदर्भात नागपूर लोकसभा मतदार संघांतर्गत असलेल्या मध्य नागपूर मतदार संघातील सहा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीसुद्धा आपला अहवाल सादर केला असून, त्या दिवशी सर्वच्यासर्व १५ सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. २५ मार्च ते २७ मार्च या कालावधीतील संपूर्ण रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याने, या तक्रारीत तथ्य नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, नागपूर मध्य विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रुममधील सीसीटीव्ही २५ मार्च ते २७ मार्चदरम्यान बंद असल्याची तक्रार काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली होती. या तक्रारीचे अवलोकन करण्यात आले. तेव्हा उपरोक्त कालावधीत सर्वच्यासर्व १५ सीसीटीव्ही कार्यरत होते, तसेच या कालावधीतील संपूर्ण रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. याबाबत अधिक तपशिलाने त्यांनी अहवालात सांगितले की, २५ मार्च रोजी कळमना मार्केट येथून ३७४ कंट्रोल युनिट (सीयू) ताब्यात घेऊन त्या सरपंच निवास सभागृह नागपूर येथील सुरक्षा कक्षात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष ठेवण्यात आले. यावेळी अॅड. अभय अ. रणदिवे, तीर्थनंदन पटोले, अनिल मालापुरे, शिवराज बाबा गुजर हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षºया सुरक्षा कक्ष सीलबंद करताना घेण्यात आलेल्या आहेत. तसेच या प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले असून त्यांच्या सीडी उपलब्ध आहेत. त्याबाबतची ताबा पावतीची छायांकित प्रतही त्यांनी सोबत जोडलेली आहे. नंतर त्यांनी अहवालात सांतिले की, २७ मार्च रोजी कळमना मार्केट येथून ४०३ व्हीव्हीपॅट, ३५० सीयू बॅटरी, ३५० व्हीव्हीपॅट बॅटरी व ३५० पेपर रोल पोलीस सुरक्षेमध्ये सरपंच निवास सभागृह नागपूर येथे आणण्यात आले. यावेळीही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी अॅड. अभय रणदिवे, तीर्थनंदन पटले, अनिल मालापुरे यांच्यासमोर सुरक्षा कक्षाचे सील सुस्थितीत असल्याबाबत त्यांची खात्री झाल्यावर त्यांच्यासमोरच पोलिसांकडून ताबा घेतल्यानंतर उघडण्यात आले. ताबा पावतीवर राजकीय प्रतिनिधींच्या स्वाक्षºया घेण्यात आल्या व त्यानंतर राजकीय प्रतिनिधींसमक्ष ४०३ व्हीव्हीपॅट, ३५० सीयू बॅटरी, ३५० व्हीव्हीपॅट बॅटरी व ३५० पेपर रोल सुरक्षा कक्षात ठेवण्यात आले. राजकीय पक्षंच्या प्रतिनिधीसमोर सुरक्षा कक्ष सीलबंद करण्यात आले.
या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्याच्या सीडी उपलब्ध आहेत. सुरक्षा कक्षाबाबतच्या सूचनानुसार सुरक्षा कक्षासाठी ताबा रजिस्टर, लॉग बुक ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व नोंदी घेतल्या जात आहेत. सुरक्षा कक्षासाठी चार पोलीस पथके तैनात आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार संपूर्ण कार्यपद्धती अवलंबिण्यात आलेली आहे.
ही तक्रार एका व्हिडिओवरून करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हे छायाचित्रीकरण खासगी व्यक्तीने केलेले असण्याची शक्यता आहे. त्या व्यक्तीचा शोघ घेऊन त्याच्यावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही अहवालात स्पष्ट केले आहे.