सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाच दिवस होता पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:44 PM2020-06-16T22:44:18+5:302020-06-16T22:46:59+5:30
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे हा रुग्ण ११ ते १५ जूनपर्यंत सीव्हीटीएस विभागात उपचार घेत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे हा रुग्ण ११ ते १५ जूनपर्यंत सीव्हीटीएस विभागात उपचार घेत होता. यामुळे अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहेत. रुग्णालयातील दोघांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन तर ४०वर डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मंगळवारी १२ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या १०७७ झाली आहे.
‘सुपर’मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाने ४ जून रोजी बाह्यरुग्ण विभागातून उपचार घेतले. ५ जून रोजी या रुग्णावर एन्जिओग्राफी झाली. ११ जून रोजी सीव्हीटीएस विभागात भरती करण्यात आले. हा रुग्ण १४ जूनपर्यंत भरती होता. १५ नोव्हेेंबर रोजी रुग्णाच्या नातेवाईकांनी स्वत:च्या जबाबदारीवर रुग्णालयातून सुटी घेऊन खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. खासगी हॉस्पिटलने त्यापूर्वी कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. त्यानुसार एका खासगी प्रयोगशाळेत नमुने तपासले असता ते पॉझिटिव्ह आले. या घटनेवर विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील म्हणाले, ४०वर डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे नमुने घेतले आहेत. दोघांना क्वारंटाईन केले आहे, तर इतरांना होम क्वारंटाईन सांगितले आहे. रुग्णालयातील प्रत्येक जण सुरक्षेची साधने वापरूनच रुग्णसेवा देतात.
दुसऱ्याच दिवशी रुग्णांची संख्या कमी
नागपूर जिल्ह्यात सोमवारी ६० रुग्णांची नोंद झाली असताना मंगळवारी रुग्णांची संख्या १२ वर आली. यामुळे आरोग्य यंत्रणेला काही दिलासा मिळाला. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये बजेरिया येथील एक तर दुसरा रुग्ण काटोल येथील आहे. एम्सच्या प्रयोगशाळेत चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. हिंगणा रोड अमरनगर येथील हे रुग्ण आहेत. हे रुग्ण वनामती येथे क्वारंटाईन होते. मेडिकलच्या प्रयोगशाळेतून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील पाच रुग्ण नाईक तलाव, बांगलादेश येथील आहेत. पाचपावली सेंटर येथे हे रुग्ण क्वारंटाइन होते. अमरावती येथून मेडिकलमध्ये भरती झालेला एक रुग्णही पॉझिटिव्ह आला आहे.
पाच रुग्णांना डिस्चार्ज
मेडिकलमधून आज चार रुग्णांना सुटी देण्यात आली. हे सर्व रुग्ण नाईक तलाव, बांग्लादेश येथील आहेत. तर एम्समधून धंतोली येथील एक रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ६५३ रुग्ण रुग्णालयातून घरी परतले आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १८६
दैनिक तपासणी नमुने २५०
दैनिक निगेटिव्ह नमुने २३८
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १०७७
नागपुरातील मृत्यू १७
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ६५३
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३,५७२
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २,३२८
पीडित- १,०७७-दुरुस्त-६५३-मृत्यू-१७