घरी बसून काढणाऱ्या लर्निंग लायसन्सवरही असणार नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 10:56 AM2021-07-03T10:56:49+5:302021-07-03T11:00:55+5:30
Nagpur News लर्निंग लायसन्सची परीक्षा लवकरच ‘इन कॅमेरा’ होणार आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने घरी बसून शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु कुणीही परीक्षा देऊ शकत असल्याने अंध, अपंगांनासुद्धा हे लायसन्स मिळण्याची शक्यता आहे. यामुळे या योजनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यावर उपाय म्हणून लर्निंग लायसन्सची परीक्षा लवकरच ‘इन कॅमेरा’ होणार आहे.
केंद्र शासनाने आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. त्या आधारावर घरबसल्या ‘लर्निंग लायसन्स’ काढणे अधिक सोपे झाले आहे. यासाठी उमेदवाराला परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर स्वत:चा आधारकार्ड नंबर टाकून विचारलेली माहिती नोंदवून व रस्ता सुरक्षेचा व्हिडीओ पाहिल्यावर लायसन्ससाठी आवश्यक असलेली परीक्षा देता येते. यात ६० टक्के अचूक उत्तरे दिल्यावर लर्निंग लायसन्सची प्रिंट मिळते. या योजनेचा लाभ आतापर्यंत शेकडो उमेदवारांनी घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी व दलालांना फाटा देण्यासाठी ही सेवा उत्तम असली तरी परीक्षेवर आरटीओची नजर राहत नाही. यामुळे एखाद्याची परीक्षा दुसरा व्यक्तीसुद्धा देऊ शकतो. यासंदर्भातील तक्रारीही वाढल्या आहेत. यावर परिवहन विभागाचे आयुक्त अविनाश ढाकणे यांनी ‘इन कॅमेरा’ लर्निंग लायसन्सची परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ऑनलाईन प्रणालीत तसे बदल केले जात आहेत.
-तर लायसन्ससाठी कायमस्वरूपी अपात्र
दुसऱ्याच्या नावाने लर्निंग लायसन्सची परीक्षा देणाऱ्या प्रकरणात दोषी आढळणारा अर्जदार मोटार वाहन कायद्यानुसार लायसन्ससाठी कायमस्वरूपी अपात्र ठरतो. यामुळे महा-ई-सेवा केंद्र, ड्रायव्हिंग स्कूल व इंटरनेट कॅफेवर लक्ष ठेवून हा प्रकार होत असल्यास कारवाई करण्याचा सूचना परिवहन विभागाने आरटीओ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांनी गैरप्रकाराच्या विरोधात आरटीओ कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
- परीक्षेचे महत्त्व पटवून दिल्यास गैरप्रकाराला आळा बसेल
मोटार वाहन कायद्यानुसार शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी परीक्षा देणे आवश्यक आहे. संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहनचालकांच्या जबाबदारीचे महत्त्व सांगणारी ही परीक्षा असते. या प्रणालीचा वापर करताना पालकांनी त्यांच्या पाल्यांना परीक्षेचे महत्त्व पटवून दिल्यास, या प्रणालीचा गैरवापर होणार नाही. परंतु काही जण गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे लवकरच या परीक्षा ‘इन कॅमेरा’ घेतल्या जाणार असून, प्रणालीत तसा बदल केला जाणार आहे.
- अविनाश ढाकणे, आयुक्त परिवहन विभाग