‘त्या’ मृत शिकारी वाघाची होणार कोविड तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 10:41 PM2020-06-25T22:41:05+5:302020-06-25T22:42:36+5:30
पाच जणाचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाचा (केटी वन) गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रामध्ये अकस्मात संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची कोविड_१९ च्या दृष्टीनेही तापसणी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच जणाचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाचा (केटी वन) गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रामध्ये अकस्मात संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची कोविड_१९ च्या दृष्टीनेही तापसणी केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्ताचे नमुने भोपाळमधील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नागपुरातील शासकीय प्रयोगशाळेतही ते पाठविण्यात आले आहेत. शुक्रवारपर्यंत हा अहवाल येण्याची शक्यता आहे.
चार दिवसानंतरही या वाघाच्या मृत्यूचे रहस्य कायमच आहे. त्याच्या अकस्मात झालेल्या मृत्यूबद्दल वेगवेगळ्या शंका व्यक्त होत आहेत. हा वाघ आजारी नव्हता. त्याचे वजनही १८० किलोग्रॅम होते.आणल्यावर दोनतीन दिवसानी त्याने आहार सुरू केला होता. कसलाही आजार नसल्याने कोणताही उपचार सुरू नव्हता.
महाराज बाग प्राणिसंग्रहालयाने तेथे असलेल्या एकमेव वाघिणीसाठी जोडीदार म्हणून या वाघाची मागणी केली होती. यासाठी १६ जूनला महाराज बाग व्यवस्थापनाने प्रधान मुख्य संरक्षण (वन्यजीव) कार्यालयाला पत्रही दिले होते. याच्या काही दिवसापूर्वीच एक चमूने जाऊन या वाघाची पाहणी केली होती. २२ जूनच्या पहाटे ५.३० वाजता वन कर्मचाऱ्यांनी या वाघाला एन्क्लोजरमध्ये फिरताना पाहिले. तसे व्हिडीओ फुटेजही आहेत. मात्र तासाभरातच या वाघाचा मृत्यू झाला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. शवविच्छेदात त्याच्या शरीरात पस आढळला. मात्र शरीरावर कसलीही जखम नव्हती. सर्पदंशाची शक्यता वर्तविली जात असली तरी त्याच्या शरीरावर सर्पदंशाचेही व्रण आढळले नव्हते.
एकंदर परिस्थिती लक्षात घेता गोरेवाडा प्रशासनाचे या वाघाचा सेफ्टीसेमियामुळे (संक्रमण) मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली आहे. मात्र वन्यजीव विशेषज्ज्ञांच्या मते, सेफ्टीसेमियासारखा आजार अॅन्टिबायोटिक देऊन सहजपणे दुरुस्त केला जाऊ शकतो. उत्तम आहार आणि औषधोपचारातूनही असा वाघ दुरुस्त होऊ शकतो.