Corona Virus in Nagpur; -तर तबलिग जमातीच्या लोकांवर होणार गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 09:02 PM2020-04-07T21:02:03+5:302020-04-07T21:03:17+5:30
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी स्पष्ट केले की मरकजहून परतलेल्यांनी कोरोनाची तपासणी करणे अनिवार्य आहे. यासाठी तपासणी केंद्र सुरू केले आहे. मरकजच्या लोकांनी स्वत: पुढे येऊन आपली माहिती देऊन तपासणी करून घ्यावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज येथून आलेले तबलिगी जमातीचे लोक आपली माहिती पोलीस व प्रशासनापासून लपवित आहे. हे लोक लवकरात लवकर पुढे न आल्यास त्यांच्या विरुद्ध पोलीस कठोर कारवाई करणार आहे. अशा लोकांविरुद्ध पोलीस भा.दं.वि. च्या कलम १८८ अन्वये कारवाई करणार आहे. सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलले आहे.
निजामुद्दीनमध्ये आयोजित मरकज संमेलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून ११ लोक गेले होते, ते परत आले आहेत. त्याचबरोबर ५२ लोक दिल्ली मरकज संमेलन सुरू होण्यापूर्वी परतले होते. या ५२ पैकी ८ लोक विदेशातील होते. या संमेलनात सहभागी झालेल्या शेकडो लोकांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे. देशभरात मरकजमध्ये सहभागी झालेले तबलिगी जमातीचे लोक कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. नागपुरातसुद्धा मरकजला गेलेले पॉझिटिव्ह निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी स्पष्ट केले की मरकजहून परतलेल्यांनी कोरोनाची तपासणी करणे अनिवार्य आहे. यासाठी तपासणी केंद्र सुरू केले आहे. मरकजच्या लोकांनी स्वत: पुढे येऊन आपली माहिती देऊन तपासणी करून घ्यावी. संमेलनात सहभागी झालेल्या शहरातील नागरिकांनी तात्काळ जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षाशी संपर्क करून कोरोनाची तपासणी करावी. असे जे करणार नाहीत पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत. इच्छुक नागरिकांनी कोरोना तपासणी करण्यासाठी नियंत्रण कक्षाच्या ०७१२-२५६२६६८ तसेच मनपाच्या ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर संपर्क करावा.
पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार विनंती केल्यानंतरही काही संदिग्ध लोक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तीन दिवसात मध्य नागपूरमध्ये दोन जण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. ३ एप्रिलला तकिया परिसरातील एका टोपी विक्रेत्या युवकाला कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तो १५ मार्च रोजी दिल्लीतून परतला होता. त्याचा मरकजशी संबंध नव्हता. त्यानंतरही तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तो मूळचा बिहारचा आहे. तो पत्नी व मुलासोबत राहतो. त्याने प्रशासनाला पत्नी व मुले बिहारमध्ये असल्याचे सांगितले. पण प्रशासनाने त्याच्यावर विश्वास न ठेवता पोलीस व महापालिकाच्या अधिकाऱ्यांनी तो ज्या इमारतीत राहत होता, तिथे चौकशी केली असता त्याचे कुटुंबीय असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याचे कुटुंबीय व शेजारच्यांना क्वारंटाईन करण्यात आले. लोकांकडून असहकार्य मिळत असल्याने पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेतला आहे.
सहकार्य मिळत नाही, उलट विरोध होतो
कोरोना संशयिताची माहिती गोळा करण्यासाठी घरोघरी जात असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी विरोधाचा सामना करावा लागतो आहे. तीन दिवसापूर्वी मनपा रुग्णालयातील काही महिला कर्मचारी पूर्व नागपूरच्या काही वस्त्यांमध्ये गेल्या होत्या. त्यांनी लोकांना दिल्लीवरून कुणी आले का? यासंदर्भात विचारले असता लोक भडकले. लोकांनी त्यांचे कागदपत्र फाडण्याचा प्रयत्न केला. तसेच पूर्व नागपुरातील एका वस्तीत औषधांची फवारणी करणाºया फायलेरिया विभागाच्या एका पथकाला धमकी देऊन परत पाठविले. कर्मचाºयांनी समजविल्यानंतरही लोक शांत झाले नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत लोकांकडून सहकार्य मिळत नसल्याने सेवा देणाºया आरोग्य कर्मचाºयांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे.