'५०,००० जणांना रोजगार मिळणार, त्याची ‘लिस्ट’ही जाहीर करणार'; नितीन गडकरींची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 04:13 PM2020-02-15T16:13:00+5:302020-02-15T17:31:29+5:30
नागपूरसह विदर्भातील ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह विदर्भातील ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. अनेकदा आपल्या भाषणात ते याचा उल्लेख करीत असतात. शनिवारी सुद्धा एका पत्रपरिषदेत ५० हजार लोकांना रोजगार मिळेलच असे जाहीर करीत याची ‘लिस्ट’च आपण जाहीर करू, असा दावा गडकरी यांनी पुन्हा एकदा केला.
नागपुरात खासदार औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती देण्यासाठी शनिवारी रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉंइट येथे पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्मॉल इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे सांगत क्लस्टरच्या माध्यमातून नागपूर व विदर्भातील लोकांना कसा रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे, याची माहिती दिली. यासोबतच त्यांनी पुन्हा एकदा याची आठवण करून दिली की, मी ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे म्हणालो होतो. तो रोजगार उपलब्ध होणारच. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. एकट्या मिहानमध्येच ३३ हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे. कुणाकुणाला रोजगार मिळ्राला याची एक लिस्टच आपण जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले.