उद्योगांवर दीर्घकालीन विपरीत परिणाम दिसून येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:26 PM2020-09-09T23:26:23+5:302020-09-09T23:31:51+5:30

देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम उद्योगांवर होताना दिसत आहे. जूनमध्ये उद्योग सुरू झाल्यानंतर काही दिवस जुन्या ऑर्डरमुळे तग धरू शकले. पण आता ऑर्डर नसल्याने पुढे उद्योग चालविणे मालकांना कठीण होणार आहे. काही दिवसानंतरच उद्योगांवर विपरीत परिणाम दिसून येणार असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे.

There will be long-term adverse effects on the industries | उद्योगांवर दीर्घकालीन विपरीत परिणाम दिसून येणार

उद्योगांवर दीर्घकालीन विपरीत परिणाम दिसून येणार

Next
ठळक मुद्दे कोरोना महामारीत ऑर्डर मिळणे बंदउधारी देत नाहीत कॉर्पोरेट व पीएससी कंपन्या


लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम उद्योगांवर होताना दिसत आहे. जूनमध्ये उद्योग सुरू झाल्यानंतर काही दिवस जुन्या ऑर्डरमुळे तग धरू शकले. पण आता ऑर्डर नसल्याने पुढे उद्योग चालविणे मालकांना कठीण होणार आहे. काही दिवसानंतरच उद्योगांवर विपरीत परिणाम दिसून येणार असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे.
जूनमध्ये उद्योग सुरू झाल्यानंतर जुन्या ऑर्डरच्या आधारे कंपन्या सुरू राहिल्या. बँकांनी २० टक्के भांडवल दिले. त्या आधारे मालकांनी कामगारांना पगार दिले, जुने देणे चुकते केले आणि कंपन्या सुरू केल्या. जुने ऑर्डर पूर्ण केल्यानंतर आता नवीन ऑर्डर येणे बंद झाले आहे. देशातील पुरवठा साखळीच तुटली आहे. या अंतर्गत हिंगणा आणि बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या बंद झाल्या आहेत. सुरू असलेल्या कंपन्या पुढे बंद झाल्यास त्या पुन्हा सुरू होणे कठीण आहे. पूर्वीच मंदीत असलेली त्यामुळे नागपूरची अर्थव्यवस्था आणखी मंदीत येणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
लॉकडाऊननंतर बंद असलेल्या कंपन्या सुरू करण्यास उद्योजकांना महत प्रयत्न करावे लागले संपूर्ण परिसर सॅनिटाईज्ड करून कामगारांना मास्क वाटप करून तसेच त्यांच्या प्रकृतीची काळजी घेऊन कारखाने सुरू झालेत. पण सध्या स्थिती चांगली नाही. अनेकांनी खर्चात वाढ होऊ नये म्हणून स्वत:हून कारखाने बंद केले आहेत. जीडीपीमध्ये २३ टक्क्यांची घसरण झाल्याचा अहवाल असताना नागपुरातही त्याचा काय परिणाम झाला असेल, यावर चिंतन करण्याची गरज आहे. याकरिता सरकारने उद्योजकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी उद्योजकांनी लोकमतशी बोलताना केली.
.कारखान्यात एखादा कामगार कोरोनाग्रस्त आढळल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला दिली जाते. दोन दिवस कारखाना बंद ठेवून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कामगारांची कोरोना चाचणी करून कारखाना सॅनिटाईज्ड करण्यात येतो. याशिवाय कुटुंबीयांचीही माहिती आरोग्य विभागाला देण्यात येते. याप्रकारे कामगारांची काळजी कारखानदार घेत असल्याचे उद्योजक म्हणाले. कोरोना रुग्ण आढळल्यानंतरही कारखान्यांची स्थिती खराब झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना नव्हे तर अर्थपुरवठ्याअभावी कारखाने बंद होणार
हिंगणा एमआयडीसीमध्ये सध्या जवळपास ७०० कारखाने सुरू आहेत. त्यापैकी अनेक कारखान्यांची स्थिती चांगली नाही. पुढील काही दिवसात कोरोनामुळे नव्हे तर अर्थपुरवठ्याअभावी कारखाने बंद होण्याची भीती आहे. मोठ्या कंपन्यांवर अवलंबून असणारे लघु उद्योग बंद झाले आहेत. कारखान्यांमध्ये मंदीचे सावट आहे.
चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष हिंगणा एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशन.

Web Title: There will be long-term adverse effects on the industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.