महिला पोलीस ठाण्यासाठी सायकलने फिरणार राज्यभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 09:03 PM2018-08-04T21:03:05+5:302018-08-04T21:08:58+5:30
अन्यायग्रस्त महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली की तिचा सामना पुरुष पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी होतो. पुरुष पोलिसांना घटनाक्रम सांगावा लागतो. घटनाक्रम सांगताना आणि पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पुन्हा आपल्यावर अन्याय होत असल्याचा भास संबंधित महिलेस होतो. त्यामुळे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर महिला पोलीस ठाणे सुरू करावेत, या मागणीसाठी नागपूरचे श्रीधर आडे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे. सायकलने विविध जिल्ह्यांत फिरून महिलांची दोन लाख पत्रं जमा करून ते मुख्यमंत्र्यांना सादर करण्याचा मानस त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्यायग्रस्त महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली की तिचा सामना पुरुष पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी होतो. पुरुष पोलिसांना घटनाक्रम सांगावा लागतो. घटनाक्रम सांगताना आणि पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पुन्हा आपल्यावर अन्याय होत असल्याचा भास संबंधित महिलेस होतो. त्यामुळे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर महिलापोलीस ठाणे सुरू करावेत, या मागणीसाठी नागपूरचे श्रीधर आडे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे. सायकलने विविध जिल्ह्यांत फिरून महिलांची दोन लाख पत्रं जमा करून ते मुख्यमंत्र्यांना सादर करण्याचा मानस त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
नागपूर येथील न्यू मानकापूर रिंगरोड परिसरातील रहिवासी असलेला तरुण श्रीधर आडे हे डिसेंबर २०१६ पासून स्वखर्चाने, लोकवर्गणी करून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ, दहेज हटाओ’साठी राष्ट्रीय जनजागृती करतात. आतापर्यंत त्यांनी १७ हजार किलोमीटरचे अंतर सायकलने पूर्ण करून १५ राज्यांतील १६५ जिल्ह्यांत हुंडाप्रथाविरोधात लढा देण्यासाठी ५,५०० स्वयंसेवकांना एकत्र केले आहे. अभियानासाठी फिरत असताना त्यांनी सामाजिक समस्या, तेथील महिला किती सुरक्षित आहेत, त्यांना दडपणविरहित वातावरण देण्यासाठी तेथील राज्य शासनाने काय उपाययोजना केल्या, या उपाययोजनांचा महिलांना फायदा कसा होतो, याची माहिती गोळा केली. ही माहिती गोळा करीत असताना प्रत्येक राज्यात जिल्हास्तरावर महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतीत महाराष्ट्र राज्य कमालीचे पिछाडीवर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. निर्भया कांडानंतर तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन असावे, याबाबत सर्व राज्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार देशातील २४ राज्यांत ६२२ पेक्षा अधिक स्वतंत्र महिला पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले. यात तामिळनाडूत २०२, उत्तर प्रदेश ७१, पश्चिम बंगाल, बिहार व राजस्थानमध्ये प्रत्येकी ४०, कर्नाटक ३५, गुजरात २८, हरियाणा ३१ आणि झारखंडमध्ये स्वतंत्र ३० महिला पोलीस ठाणे सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण अधिक असूनही महिलांसाठी स्वतंत्र ठाणे नसल्याचे श्रीधर आडे यांना जाणवले. त्यामुळे या ज्वलंत प्रश्नासाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला. आगामी ३० आॅगस्टपासून ते सायकलने राज्यभरात फिरणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून ते आपला प्रवास सुरू करणार आहेत.
असे राहील अभियान
श्रीधर आडे यांनी स्वतंत्र महिला पोलीस ठाण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सायकलने फिरण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्यांची निवड केली आहे. यात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ते महिला मंडळ, महिलांच्या संघटनांची भेट घेऊन जनजागृती करणार आहेत. राज्यभरातील दोन लाख महिलांकडून ते स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून घेतील. अभियानात ‘लोकमत’च्या सखी मंचचे सहकार्य घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोळा केलेले दोन लाख पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपवून प्रत्येक जिल्हास्तरावर महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी ते करणार आहेत.