पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये रिफायनरी राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:07+5:302021-07-02T04:07:07+5:30

पाईपलाईनने नाफ्ता आणि गॅस आणून पेट्रोकेमिकल उत्पादन निर्मिती कमल शर्मा नागपूर : विदर्भात ज्या पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी तांत्रिक व्यवहारिता (टेक्नो ...

There will be no refinery in the petrochemical complex | पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये रिफायनरी राहणार नाही

पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये रिफायनरी राहणार नाही

Next

पाईपलाईनने नाफ्ता आणि गॅस आणून पेट्रोकेमिकल उत्पादन निर्मिती

कमल शर्मा

नागपूर : विदर्भात ज्या पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी तांत्रिक व्यवहारिता (टेक्नो फिजिबिलिटी) रिपोर्ट तयार होईल त्यात पेट्रोलियम रिफायनरीचा समावेश राहणार नाही. पेट्रोल-डिझेल-गॅस याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससुद्धा मोठा प्रकल्प आहे. परंतु रिफायनरीच्या तुलनेत लहानच. याचा अंदाज यावरूनच लावता येऊ शकतो की, रिफायनरीसाठी तीन लाख कोटी रुपयाचा खर्च येतो. तर पेट्रोकेमिकल काॅम्प्लेक्स ७५ हजार ते एक लाख कोटीमध्ये साकार होऊ शकतो. अशा परिस्थितीत विदर्भासाठी थोडी खुशी-थोडा गम मिळाले, असे म्हणता येईल.

विदर्भात ऑईल रिफायनरीची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. असा दावा केला जातो की, रिफायनरी सुरू झाल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल. तसेच अनेक उद्योगही स्थापित होतील. परंतु पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या मागणीला घेऊन दिल्लीत गेलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी टेक्नो फिजिबिलिटी रिपोर्ट करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, रिफायनरीला हिरवी झेंडी मिळालेली नाही. लोकमतने यासंदर्भात माहिती घेतली असता, या क्षेत्रातील जाणकार मंडळींनी स्पष्ट केले की, विदर्भाला पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देण्याची तयारी सुरू आहे. याअंतर्गत पाईपलाईनने बीना, विशाखापट्टणम किंवा अन्य कुठल्याही रिफायनरीमधून नाफ्ता व नैसर्गिक गॅस विदर्भात आणला जाईल. पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये याला ‘क्रॅक’ करून २० ते २५ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जाईल. याचा उपयोग या कच्च्या मालाच्या रूपात एमएसएमई उद्योग करू शकतील. त्यामुळे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समुळे विदर्भात अनेक लहान - लहान उद्योग येऊ शकतात, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.

बॉक्स

- प्रकल्प बुटीबोरी-कुहीमध्ये उभारला जाऊ शकतो

रिफायनरीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नरत असलेल्या विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट(वेद)ने बुटीबोरीतील खाली जागा रिफायनरीसाठी सुचविली होती. परंतु तिथे जागा कमी असल्यामुळे कुही-मांढळमध्ये या प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जागेवरही विचार होऊ शकतो. पेट्रोकेमिकल काॅम्प्लेक्ससाठी जागा कमी लागते. त्यामुळे बुटीबोरी आता चांगला पर्याय होऊ शकतो. येथून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासह रेल्वेलाईनही दूर नाही.

बॉक्स

- कॉम्प्लेक्सचे फायदे

- कॉम्प्लेक्समध्ये पॉलिमर तयार होते. यातून उद्योगांना लागणारे पॅकिंग मटेरियल तयार केले जाते.

- पॉलिस्टर तयार होईल. याचा वापर करून वस्त्रोद्योग कंपनी विदर्भाला या क्षेत्रात सक्षम करू शकते. कापसाला औद्योगिक दर्जा मिळेल.

- आर्टिफिशियल रबर आणि कार्बन ब्लॅकचे उत्पादन होईल. याचा वापर टायर बनविण्यासाठी होतो. टायर बनविणाऱ्या कंपन्या या प्रकल्पाच्या जवळपास आपल्या कंपन्या सुरु करू शकतात.

- ऑटोमाबाईल कंपन्यंनाही कच्चा माल मिळेल. या कंपन्या विदर्भात प्रकल्प स्थापित करण्याचा विचार करू शकतात.

- पीव्हीसी व सीपीव्हीसीचेही उत्पादन होईल. याचा थेट लाभ बांधकाम क्षेत्राला होईल.

बॉक्स

- बाडमेरमध्ये रिफायनरी होऊ शकते तर विदर्भात का नाही?

केंद्र सरकारने राजस्थानमधील बाडनेरमध्ये रिफायनरीला मंजुरी दिली आहे. तो परिसरसुद्धा समुद्रतटापासून कोसोदूर आहे. तेव्हा बाडमेरमध्ये रिफायनरी होऊ शकते तर मग विदर्भात का नाही, असा प्रश्न निर्माण होतो. पेट्रोकेमिकल काॅम्प्लेक्स आल्याने विदर्भाला फायदा होईल. परंतु यात रिफायनरीसुद्धा असती तर आणखी चांगले झाले असते.

प्रदीप माहेश्वरी, उपाध्यक्ष (वेद) तसेच रिफायनरी-पेट्रोकेमिक्ल क्षेत्रातील तज्ज्ञ

- रिफायनरी व पेट्रोलियम काॅम्प्लेक्समधील फरक

रिफायनरी पेट्रोलियम काॅम्प्लेक्स

खर्च तीन लाख कोटी रुपये - एक लाख कोटी रुपये

१५ हजार एकर जागा आवश्यक - ५ ते ६ हजार जागा

क्रूड ऑईलचा वापर - नाफ्ता आणि नैसर्गिक गॅसचा वापर

पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसचे उत्पादन - २० ते २५ प्रकारच्या पेट्रोकेमिक्ल उत्पादनाची निर्मिती

इंधन स्वस्त होण्याचा मार्ग - कृषी, उद्योग, बांधकाम क्षेत्राला लाभ

पेट्रोलियम काॅम्प्लेक्स विकसित होऊ शकतो - रिफायनरी स्थापित होण्याची शक्यता नाही.

सर्व रिफायनरी फायद्यात - कॉम्प्लेक्स फायद्यात राहिलच असे नाही.

Web Title: There will be no refinery in the petrochemical complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.