‘रंगदेवता आणि रसिकांना अभिवादन करून’ची होणार पुन्हा गर्जना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 09:51 PM2020-11-04T21:51:44+5:302020-11-04T21:54:09+5:30
Theatre for Drama Unlock तब्बल साडेसात महिन्यापासून टाळेबंद असलेली नाट्यगृहे पुन्हा सुरू होत आहेत आणि सर्वांना सुपरचित असलेली सूत्रधाराची विनवणी घोषणा ‘रंगदेवता आणि नाट्यरसिकांना अभिवादन करून सादर करत आहोत’चे स्वर गुंजणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल साडेसात महिन्यापासून टाळेबंद असलेली नाट्यगृहे पुन्हा सुरू होत आहेत आणि सर्वांना सुपरचित असलेली सूत्रधाराची विनवणी घोषणा ‘रंगदेवता आणि नाट्यरसिकांना अभिवादन करून सादर करत आहोत’चे स्वर गुंजणार आहे. मुहूर्तही उत्तम साधला गेला आहे आणि तो म्हणजे जागतिक मराठी रंगभूमी दिनाचा.
जागतिक मराठी रंगभूमी दिनी, गुरुवारी ५ सप्टेंबरपासून राज्यातील जलतरण तलाव, इनडोअर गेम्स, क्रीडा हाऊसेस, चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स यांच्यासह नाट्यगृहे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यशासनाच्या या निर्णयामुळे सांस्कृतिक क्षेत्रासमोर आलेले संकट निस्तरण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे गेली साडेसात महिने बंद पडलेली नाट्यगृहे पुन्हा रंगकर्मी, गायक, नर्तक यांच्या रहीवाटीने भरून निघणार आहेत. यासाठी ५० टक्के आसनक्षमतेचीच परवानगी देण्यात आली आहे.
नागपुरात वसंतराव देशपांडे सभागृह, सायंटिफिक सभागृह, कविवर्य सुरेश भट सभागृह, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, साई सभागृह आहेत. ही सभागृहे आता पुन्हा सुरू होणार असल्याने कलावंत आपली थांबलेली गाडी पुन्हा हाकण्याचा प्रयत्न करणार आहेत. चित्रपटगृहेही ५० टक्के आसनक्षमतेने सुरू होणार असल्याने चित्रपटगृह मालक आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंदाचे हसू उमटणार आहेत.
नाट्यस्पर्धा, महोत्सवास मिळणार का परवानगी?
ऑगस्ट महिन्यापासूनच विदर्भात विविध नाट्यस्पर्धा, नाट्यमहोत्सव, संगीत-नृत्य महोत्सवाचे आयोजन होत असते. वेगवेगळ्या ठिकाणांहून कलावंत यात सहभागी होत असतात. आता अनलॉक अंतर्गत नाट्यगृहांना परवानगी मिळाली असली तरी महोत्सवाला परवानगी मिळेल का, असा प्रश्न आहे.
झाडीपट्टीचे टेन्शन अजूनही कायम!
नाट्यगृहे सुरू करण्याची आणि सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के आसनक्षमतेने करण्याची परवानगी मिळाली असली तरी झाडीपट्टी रंगभूमीवरचे टेन्शन अजूनही संपले नाही. झाडीपट्टी रंगभूमीवर खुल्या मैदानात अगर शेतात शामियाना बांधून तेथे अस्थायी रंगमंच उभारून नाटके होत असतात. त्यामुळे, झाडीपट्टी रंगभूमीवरील स्थिती अजूनही स्पष्ट नाही.