लसीकरणानंतरही कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून येणाऱ्यांचा होणार अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 07:00 AM2021-06-12T07:00:00+5:302021-06-12T07:00:07+5:30
Nagpur News ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅपिडिमोलॉजी’ (एनआयई) चेन्नईच्यावतीने देशात ११ ठिकाणी वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातील नागपूर मेडिकलची निवड करण्यात आली आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही काहींमध्ये गंभीर लक्षणे दिसून त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत आहे तर, काहींमध्ये लसीकरणानंतर ‘आरटीपीसीआर’ची चाचणी निगेटिव्ह येत आहे. यावर ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅपिडिमोलॉजी’ (एनआयई) चेन्नईच्यावतीने देशात ११ ठिकाणी वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातील नागपूर मेडिकलची निवड करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. लस घेतल्यानंतरही कदाचित विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, पण त्याचे गंभीर परिणाम होत नाहीत. तसेच मृत्यूदरही रोखता येऊ शकतो. लसीचे दोन डोस घेतल्यावर अॅण्टिबॉडिज तयार होण्यास किमान तीन ते चार आठवडे लागतात. मात्र, त्याला सहव्याधी (कोमॉर्बिडीटी) असणारे अपवाद ठरु शकतात. लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण देशात फार कमी आहे. असे असलेतरी, काहींना लसीकरणानंतरही गंभीर लक्षणामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागते तर काहींची लसीकरणानंतर आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह येते. याचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी ‘आयसीएमआर’ने पुढाकार घेतला आहे. ‘इफेक्टिव्हनेस ऑफ कोव्हॅक्सीन अॅण्ड कोविशील्ड व्हॅक्सीन अगेन्स्ट सिव्हिअर कोविड -१९ इन इंडिया, २०२१ : मल्टी सेंट्रीक बेस्ड केस कंट्रोल स्टडी’ या नावाने देशात निवड केंद्रावर अभ्यास केला जाणार आहे.
-४५ वर्षांवरील वयोगटात होणार अभ्यास
मेडिकलच्या ‘पीएसएम’ विभागाचे प्रमुख डॉ. उदय नारलावार यांच्या नेतृत्वात नागपुरात हा स्टडी होणार आहे. डॉ. नारलावार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ४५ वर्षांवरील वयोगटातील पुरुष व महिलांचा यात समावेश केला जाईल. ज्यांना कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सीनचा डोस घेतल्यानंतरही गंभीर होऊन रुग्णालयात भरती व्हावे लागले अशा रुग्णांची (केसेस) व लसीकरणानंतर आरटीपीसीआर निगेटिव्ह आलेल्या अशा व्यक्तींचा (कंट्रोलर) अभ्यास केला जाणार आहे. या शिवाय, वय, लिंग, त्याला त्यापूर्वी कोविड झाला होता का, कोणती लस घेतली, किती डोस घेतले, वेगवेगळ्या लोकांमध्ये कोणत्या ‘व्हेरीअंट’च्या विषाणुमुळे कोरोना झाला याचीही माहिती घेतली जाणार आहे.
-२६० लोकांवर होणार अभ्यास
नागपुरात २६० लोकांवर याचा अभ्यास केला जाणार आहे. तर, देशात १५०० ‘केसेस’ व ३००० ‘कंट्रोलर’वर नागपूर मेडिकलसह एम्स दिल्ली, जोधपूर, भुवनेश्वर, ऋषिकेश, हमदर्द दिल्ली, एसएमआयएमईआर सुरत, म्हैसूर मेडिकल, जेआयपीएमईआर पुदुचेरी, एसआरएम मेडिकल कॉलेज चेन्नई या ठिकाणी अभ्यास होणार आहे.
-डॉ. उदय नारलावार, प्रमुख पीएसएम विभाग, मेडिकल