शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 09:24 PM2020-07-07T21:24:02+5:302020-07-07T21:26:23+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार नाही, असा शासन आदेश वित्त विभागाने ४ मे रोजी निर्गमित केला होता. परंतु या आदेशाला खो देत सामान्य प्रशासन विभागाने ७ जुलै २०२० रोजी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांत ३१ जुलैपर्यंत बदल्या करण्याचे आदेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार नाही, असा शासन आदेश वित्त विभागाने ४ मे रोजी निर्गमित केला होता. परंतु या आदेशाला खो देत सामान्य प्रशासन विभागाने ७ जुलै २०२० रोजी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांत ३१ जुलैपर्यंत बदल्या करण्याचे आदेश आहे.
या बदल्या करताना त्याची १५ टक्के अशी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. सदर बदल्या महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार करण्यात येणार आहे. दरवर्षी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या एप्रिल व मे महिन्यात करण्यात येतात. या बदल्या ३० टक्केपर्यंत असतात. मात्र यावर्षी कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात राज्याची कर व करेतर उत्पन्नातील अपेक्षित महसुली घट व त्याचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम विचारात घेऊन वित्त विभागाने विविध उपाययोजना करून बदल्यावर ४ मे नुसार निर्बंध घातले होते. मात्र शासन स्तरावर लोकप्रतिनिधी व कर्मचारी संघटना यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे अखेर सरकारला बदल्या करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या देखील सोयीच्या दृष्टीने बदल्या करण्याची मागणी कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी ग्राम विकास विभागाकडे केली आहे.