मनपाच्या कारभारात पारदर्शकता राहणार
By admin | Published: March 6, 2017 02:11 AM2017-03-06T02:11:23+5:302017-03-06T02:11:23+5:30
नागपूर महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दाखविलेल्या शहर विकासाच्या मार्गावर महापालिकेचा कारभार करणार आहे.
नंदा जिचकार : मुंबईच्या धर्तीवर नागपुरात उपलोकायुक्तांची गरज नाही
नागपूर : नागपूर महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दाखविलेल्या शहर विकासाच्या मार्गावर महापालिकेचा कारभार करणार आहे. महापालिकेच्या प्रत्येक कारभारात पारदर्शकता राहणार असल्याने मुंबईच्या धर्तीवर नागपुरात उपलोकायुक्तांची आवश्यकता नसल्याचा विश्वास नवनिर्वाचित महापौर नंदा जिचकर यांनी रविवारी व्यक्त केला. महापौरपदी निवड झाल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
शहरातील नागरिकांनी जो विश्वास दर्शविला त्याला तडा जाणार नाही. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचतील. महापालिकेच्या कारभारात त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातील. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे संकेत त्यांनी दिले.(प्रतिनिधी)
प्राध्यापक ते महापौर
नंदा जिचकार यांनी प्राध्यापिका म्हणून काम केले असून, नागपूर महापालिकेत त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. भाजपाच्या शहर महिला अध्यक्षपदाची दुसऱ्यांदा जबाबदारी त्यांच्याकडे आहे. विविध सामाजिक संस्थांची जबाबदारी सांभाळत आहेत. सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्ती म्हणून त्यांना समाजात मान आहे.
उपराजधानीच्या ५२ व्या महापौर
महापालिकेच्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळण्याचा बहुमान मिळालेल्या नंदा जिचकार उपराजधानीच्या ५२ व्या महापौर आहेत; तर त्या सातव्या महिला महापौर ठरणार आहेत.
जिचकार यांनी गडकरींची घेतली भेट
नवनिर्वाचित महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह स्थायी समितीच्या सदस्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थायी जाऊन भेट घेतली. गडकरी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
आज पदग्रहण समारंभ
नवनिर्वाचित महापौर नंदा जिचकार व उपमहापौर दीपराज पार्डीकर तसेच सत्तापक्षनेते संदीप जोशी यांचा आज सोमवारी सकाळी १० वाजता महापालिकेच्या सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयात पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. नंदा जिचकार मावळते महापौर प्रवीण दटके यांच्याकडून तर दीपराज पार्डीकर हे मावळते उपमहापौर सतीश होले यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारतील. तसेच संदीप जोशी मावळते सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.