नाटक आहे तोपर्यंत अडगळ असणार नाही : वामन केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:46 PM2019-02-23T22:46:08+5:302019-02-23T22:47:06+5:30
जोपर्यंत या जगात नाटक जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याही बाबतीत अडगळ असणार नाही , नाटक हे आदिम आहे आणि जोपर्यंत नाटक करणारा एक माणूस आणि नाटक पाहणारा ,ऐकणारा एक माणूस अशी दोन माणसं जोपर्यंत आपल्या समाजात आहेत तोपर्यंत नाटकाला मरण नाही असे विचार ज्येष्ठ रंगकर्मी ,दिग्दर्शक प्राचार्य वामन केंद्रे यांनी मांडले. शनिवारी नाट्यसंमेलनात सुरेश भट सभागृहात नाटक जगण्याची समृद्ध अडगळ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात नाट्यकर्मींनी नाटकावर होणाऱ्या अनिर्बंध घुसघोरीचा निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :जोपर्यंत या जगात नाटक जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याही बाबतीत अडगळ असणार नाही , नाटक हे आदिम आहे आणि जोपर्यंत नाटक करणारा एक माणूस आणि नाटक पाहणारा ,ऐकणारा एक माणूस अशी दोन माणसं जोपर्यंत आपल्या समाजात आहेत तोपर्यंत नाटकाला मरण नाही असे विचार ज्येष्ठ रंगकर्मी ,दिग्दर्शक प्राचार्य वामन केंद्रे यांनी मांडले. शनिवारी नाट्यसंमेलनात सुरेश भट सभागृहात नाटक जगण्याची समृद्ध अडगळ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात नाट्यकर्मींनी नाटकावर होणाऱ्या अनिर्बंध घुसघोरीचा निषेध केला.
या परिसंवादाला नाटककार अतुल पेठे, अभिनेत्री विभावरी देशपांडे आणि रंगकर्मी आशुतोष पोतदार यांनी सहभाग घेतला. नाटककार शफाअत खान यांनी या परिसंवादाचं सूत्रसंचालन केलं. मुळात सध्याच्या नाटकावर बोलणारे लोक कमी झालेत, मराठी नाटक आपली मूळ ओळख विसरत चालला आहे यावर या सर्व मान्यवरांनी परिसंवादात प्रकाश टाकला. नाटकासाठी अडगळ ही कधीच पोषक नसते. मात्र या अडगळीचा वापर करून अनेकजण नाटकासारख्या विशाल महासागरात उगीच लुडबुड करत असतात. या चुटुपुट लुडबुड करणाऱ्या लोकांना एक तर नाटकाचं महत्व त्यातील आत्मभान समजेनासं झाल्यामुळे नाटकाला विरोधाचं एक ग्रहण लागलंय असं नाटककार अतुल पेठे यांनी आपलं मत मांडलं. नाटक ही एक कला आहे आणि प्रत्येक नाटककाराला आपलं म्हणणं मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे विवेकाची कास धरलेली समृध्दी या नाटकाच्या विकास मॉडलेला समाजानेही तितकंच आपलंसं करायला हवं ही बाब अतुल पेठे यांनी बोलताना अधिक गडद केली.
मराठी रंगभूमीला बालरंगभूमीची एक खूप मोठी परंपरा आहे. मात्र आजचं बालनाट्य काही अंशी बदललं आहे. आधीच्या काळात नाटक बघताना किंवा समजून घेताना लहान मुलांच्या समोर धर्म,जात,समाज हे घटक मुळातच विचार करण्यासाठी नसायचे. मात्र सध्याची मुलं ही सोशल मिडियावर जे पाहतात किंवा टीव्हीवर जे पाहतात त्याचं अनुकरण करतात त्यामुळे बालनाट्यात हे विषय घेताना पालकांचं आणि मुळात मुलांचंच स्वातंत्र्य फार मिळत नाही. आणि असे विषय घेऊ नका मुलांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो ही ठेवणीतील वाक्यंही सर्रास बालनाट्य करणाºया ग्रुपमधून ऐकायला मिळतात. मुळात बालनाट्यांचे प्रयोग हे जास्तीत जास्त प्रमाणात होण्याची गरज आहे. सरकारने सर्व शाळांना एकत्रित करून त्या त्या शाळांमध्ये बालनाट्यांचे प्रयोग करून मुलांच्या जीवनात बदल घडवणारे नाट्यप्रयोग करण्याची गरज असल्याचे मत अभिनेत्री विभावरी देशपांडेने यावेळी मांडले.
नाटकातील समृद्ध अडगळ ही दूर होण्याची मुळातच गरज आहे. कारण जर एक नाटककार म्हणून मी माझं नाटक माझ्या घरच्यांनाच आवडलंच नाही तर मी या समोरच्या जगाला मी माझं नाटक कोणत्या अर्थांनं पटवून देणार आहे ह्याचा विचार आपल्याला सर्वांनाच करण्याची एक प्रकारे गरज आहे. व्यावसायिक दृष्ट्या नाटक करून फक्त त्याला धंदेवाईक रंगभूमीचं स्वरूप येणार असेल तर ती अडगळ तात्काळ मोडित काढण्याची गरज आहे. नाटकावर बोलणारे कमी झालेत ,नाटकावर टीका करणारे मात्र वाढलेत पण त्याच नाटकावर काही चांगले करू पाहणारे मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत तेव्हा ही अडगळ दूर करूनच समृध्द नाटकाचा वसा जपता येणार आहे असं मत नाटककार आशुतोष पोतदार यांनी या परिसंवादात मांडले. परिसंवादाला ९९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष किर्ती शिलेदार,अभिनेते मोहन जोशी, अविनाश नारकर,ऐश्वर्या नारकर आणि मोठ्या संख्येने नागपूरकरांनी उपस्थित राहत चांगला प्रतिसाद दिला.