औष्णिक वीज केंद्रातील राख शेतीसाठी घातकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:49 PM2019-07-01T22:49:04+5:302019-07-01T22:51:32+5:30
औष्णिक वीज केंद्रातील राखेत जमिनीला मारक घटक मोठ्या प्रमाणात आहेत. या राखेमुळे शेती निरुपयोगी होत असून ही राख शेतीसाठी घातक आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : औष्णिक वीज केंद्रातील राखेत जमिनीला मारक घटक मोठ्या प्रमाणात आहेत. या राखेमुळे शेती निरुपयोगी होत असून ही राख शेतीसाठी घातक आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.
कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात ‘औष्णिक वीज केंद्रातील राख शेतीची राखरांगोळी करते काय?’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. व्यासपीठावर शेतकरी चळवळीचे नेते प्रा. शरद पाटील, पर्यावरणतज्ज्ञ सुधीर पालीवाल, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. शरद पवार उपस्थित होते. प्रा. शरद पाटील म्हणाले, शेतीची माती सछिद्र असते. शेत पिकांच्या वाढीसाठी या छिद्रातून हवा आणि पाणी मिळते. परंतु औष्णिक वीज केंद्रातील राख शेतीतील छिद्र बुजविते. पहिल्या वर्षी या राखेमुळे चांगले उत्पन्न मिळते. परंतु त्यानंतर या राखेचा वापर केल्यास जमीन निरुपयोगी होते. ही राख विकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. सुधीर पालीवाल म्हणाले, इंडोनेशियातून भारतात सर्वाधिक कोळसा येतो. इंडोनेशियात या राखेचा वापर केल्यास दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. औष्णिक वीज केंद्रातील राखेचा सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. डॉ. शरद पवार म्हणाले, औष्णिक वीज केंद्रातील राखेत १० प्रकारचे धोकादायक घटक आहेत. त्याचा मनुष्य आणि प्राण्यांवर दुष्परिणाम होतो. धान्यातून ते आपल्या पोटात जातात. ही राख एवढी घातक असताना त्याचा कोणताच अभ्यास झाला नाही. राख शेतीसाठी घातक आहे की नाही याचा शोध घेऊन तोपर्यंत ही राख शेतीसाठी वापरण्यात परवानगी देऊ नये असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील छोटा नागपूर या गावात समारंंभपूर्वक शेतकऱ्यांच्या शेतीत राख टाकण्यात आली. राख किती चांगली आहे, हे शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. पहिल्या वर्षी चांगले पीक आले. त्यानंतर त्या शेतीत काहीच पिकत नाही. शेती खराब करणाऱ्या या राखेचा विरोध करण्यासाठी विदर्भात दबावगट तयार होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गिरीश गांधी यांनी औष्णिक वीज केंद्रातील राख वापरणे घातक असल्याचे सांगून या विरोधात सर्वसामान्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक श्रीराम काळे यांनी केले. संचालन प्रदीप विटाळकर यांनी केले. आभार श्रीधर सोलव यांनी मानले.