ही आमची वारसास्थळे, इतिहासाबाबत आपुलकी कुठेच ना आढळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 07:00 AM2020-12-12T07:00:00+5:302020-12-12T07:00:09+5:30

heritage Nagpur News नागपुरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. मात्र, जवळपास सर्वच्या सर्व स्थळे खंगल्या अवस्थेत आहेत.

These are our heritage sites, our affinity for history is nowhere to be found! | ही आमची वारसास्थळे, इतिहासाबाबत आपुलकी कुठेच ना आढळे!

ही आमची वारसास्थळे, इतिहासाबाबत आपुलकी कुठेच ना आढळे!

Next
ठळक मुद्देकृष्ण रुक्मिणी मंदिर परिसरगंजट्टी, मद्यपींचा रंगतो फडलव्ह बर्ड्सचे चाळे राजरोस चाले

प्रवीण खापरे - विशाल महाकाळकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जे आपला इतिहास विसरतात, त्यांना इतिहासच विसरतो, असे जे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे. अगदी विदर्भ, महाराष्ट्र, भारत खूप दूरची गोष्ट, नागपुरातच याचा साक्षात्कार घेता येतो. नागपुरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत आणि त्यातील अनेक स्थळांची प्रकरणे कोर्टात आहेत. त्यातील काहींची जबाबदारी केंद्र आणि राज्याच्या पुरातत्त्व विभागाने घेतली आहेत. मात्र, ती जबाबदारी खरेच पार पाडली जात आहे का, हा प्रश्न आहे. अनेकांची तर नोंदही नाही. जवळपास सर्वच्या सर्व स्थळे खंगल्या अवस्थेत आहेत. त्यांच्याबाबत ना शासकीय संस्थांना ना आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना आपुलकी आहे.

खामला येथून सहकारनगर विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर विमानतळाच्याच अखत्यारित असलेल्या जंगलात साधारणत: ३०० वर्षे जुने क्रिष्ण रुक्मिणी मंदिर आहे. हा एक स्थापत्याशास्त्राचा उत्तम असा नमुना आहे. येथे नजिकच गोंड-भोसले राजवटीच्या काळातील विहीर, नहर आणि अंघोळीसाठीचे ऐतिहासिक स्नानगृह आहे. कालांतराने येथे उरला आहे तो केवळ सापळाच. सर्व वास्तूंना भगदाड पडले आहेत. मंदिराच्या आणि नहरच्या मागच्या भागात गंजट्टी आणि मद्यपींचा फड रंगलेला असतो. येथेच लव्ह बर्ड्सचे चाळेही सुरू असतात. कुणालाच कुणाचे सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट होते. पोलिसांची फेरी दुरूनच निदर्शनास येत असल्याने सगळे अलर्टही होत असतात. जणू काही सर्व व्यवस्थित आहे. याबाबत शासन-प्रशासनाकडून कुठेलच पाऊल उचलले गेले नाही, ही शोकांतिका आहे. आपल्या ऐतिहासिक स्थळ, वास्तूंबाबत असलेली ही उदासीनता अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे.

 हा गांजा पोलिसांना का सापडत नाही

एकीकडे सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर ड्रग्ज प्रकरणावर आगडोंब उसळला आहे. मात्र, नागपुरात या वारसास्थळांकडे सहसा कुणाचे लक्ष जात नसल्याची संधी साधून अनेक गंजट्टी व मद्यपी सर्रास गांजाचा कश बनवताना व ओढताना आढळून येतात. एवढेच नव्हे तर उत्सुकतेपोटी या स्थळाला भेट देणाऱ्या इतिहासप्रेमींनाही ते यात सहभागी होण्याचे आवाहन करतात. या गोष्टींकडे सुरक्षा व्यवस्थेचे लक्ष का जात नाही, हा प्रश्न आहे.

 पुरातत्त्व विभाग कोण्या कामाचे

ऐतिहासिक स्थळांची निगा राखण्याचे व दुरुस्ती करण्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे असते. मात्र, शहरातील ही वारसास्थळे ढासळत चालली आहेत. याकडे या विभागांचे लक्ष नाही. तेव्हा हे विभाग कोण्या कामाचे, असा प्रश्न निर्माण होतो. संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा तर संबंधित अधिकारी कायम नॉट रिचेबल असतात, हे विशेष.

 दहाव्या वर्गात शिकणारे प्रज्वल ठाकरे, ओम काकडे व आर्यन आवळे हे विद्यार्थी यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. आम्ही इथे खेळायला येतो आणि जातो. हे स्थळ नेमके कोणत्या काळातील आहे, हे आम्हास ठाऊक नाही. मात्र, परिसर रम्य वाटतो, असे ते सांगतात.

..........

Web Title: These are our heritage sites, our affinity for history is nowhere to be found!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास