या वस्तू आमच्या उपयोगाच्या नाहीत.. तुमच्या आहेत तर घेऊन जा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:29 PM2019-08-26T12:29:09+5:302019-08-26T12:31:53+5:30

निरुपयोगी पडलेल्या सुस्थितीतील वस्तू दानरुपात घेऊन गरजू माणसांपर्यंत पोहचविणारे एक दुकान आज उघडले. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ या भावनेप्रमाणे हृदयात हात घालून दातृत्वाचा भाव या ‘दीनदयाल अनोखे दुकान’ने जागविला आहे.

These items are not in our use, if you want it, take it | या वस्तू आमच्या उपयोगाच्या नाहीत.. तुमच्या आहेत तर घेऊन जा..

या वस्तू आमच्या उपयोगाच्या नाहीत.. तुमच्या आहेत तर घेऊन जा..

googlenewsNext
ठळक मुद्देवापरात नसलेल्या वस्तू गरजवंतांपर्यंत पोहचविणार युवा झेप व माई संस्थेचा आगळावेगळा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या घरी अशा खूप वस्तू असतात, ज्या उपयोगात नसतानाही घरात पडलेल्या असतात. त्या जागा व्यापून पडलेल्या असल्या तरी कुणाला द्यावे, हा प्रश्न असतो, बरेचदा देण्याची इच्छाही नसते. अशा निरुपयोगी पडलेल्या सुस्थितीतील वस्तू दानरुपात घेऊन गरजू माणसांपर्यंत पोहचविणारे एक दुकान आज उघडले. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ या भावनेप्रमाणे हृदयात हात घालून दातृत्वाचा भाव या ‘दीनदयाल अनोखे दुकान’ने जागविला आहे.
पं. दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला अंत्योदयाचा विचार प्रत्यक्ष उतरविण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे युवा झेप प्रतिष्ठान आणि माई बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने हे ‘अनोखे दुकान’ सुरू करण्यात आले आहे. युवा झेपचे अध्यक्ष व लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून हे दुकान साकार झाले असून त्यांच्या मार्गदर्शनात माई संस्थेचे पदाधिकारी हा प्रकल्प राबविणार आहेत. या प्रकल्पाची संकल्पना विलक्षण अन् वस्तुस्थितीवर बोट ठेवणारी आहे. अनेक वस्तू काही काम नसताना घरी पडून असतात. लहान मुलांची खेळणी, सायकली काही दिवसानंतर अडगळीत पडून राहतात. केवळ शौक म्हणून घेतलेली घड्याळे, कपडे, शुज एक दोनदा वापरले की पडून राहतात. अगदी नवनवीन साड्या, क्रॉकरी, पेन, किचनमधले साहित्य आणि भेट म्हणून मिळालेल्या अनेक वस्तू उपयोगात न येता तशाच घरी जागा व्यापून राहतात. तुमच्या उपयोगात नसल्या तरी काहींना त्यांची नितांत गरज असते. कधी पैशांच्या अडचणीमुळे तर कधी वेगळ्या कारणाने त्या खरेदी करणे त्यांना शक्य होत नाही. मग आपल्याकडे अशा अडगळीत पडलेल्या वस्तूंना सोशल केले तर लाख मोलाचे समाधान मिळू शकेल, असाच संदेश या दुकानाच्या माध्यमातून दिला आहे. हो पण तुम्ही ज्या वस्तू दुकानात जमा करणार आहात त्या सुव्यवस्थित आणि चांगल्या स्थितीत असाव्या, एवढी मात्र काळजी घ्यावी लागेल.
हे अनोखे दुकान सुरेंद्रनगरच्या नासा मैदानातील राधाकृष्ण मंदिराच्या वरच्या माळ्यावर सुरू करण्यात आले आहे. रविवारी संदीप जोशी, लोकमतचे निवासी संपादक गजानन जानभोर, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, माई संस्थेच्या अध्यक्षा उषा निशितकर, सचिव कल्पना घाटोळे या मान्यवरांच्या उपस्थितीत या अनोख्या दुकानाचे औपचारिक उद््घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे हा प्रकल्प सुरू होताच अनेकांनी आपल्या घरातील सुंदर वस्तू येथे जमा केल्या.
यामध्ये गॅस शेगडी, नवनवीन साड्या, सौंदर्य प्रसाधने, भांडीकुंडी व पोळपाट लाटण्यापासून ते पलंगापर्यंत अनेक वस्तू आहेत. केवळ गरीब लोकच नाही तर काही दिवसांसाठी नागपूरला स्थलांतरित झालेले नोकरदार, विद्यार्थी किंवा ज्याला गरज असेल त्या प्रत्येकांसाठी हे दुकान दररोज सकाळी ११ ते ३ खुले राहणार आहे. वस्तू नेणाऱ्यांनी नाममात्र शुल्कात नोंदणी करणे आवश्यक आहे. उद््घाटन कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी तर माई संस्थेच्या उपाध्यक्षा सीमा गजबे यांनी आभार मानले. धंतोली परिसरात व मेडिकलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना १० रुपयात दीनदयाल थाली, रुग्णसेवा प्रकल्प व फिरत्या दवाखाना यासारखे उपक्रम राबवून युवा झेप प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. ‘दीनदयाल अनोखी दुकान’ हा या शृंखलेतील महत्त्वाचा प्रकल्प ठरला आहे.

पुण्यातील एक महिला अशाच प्रकारे घरातील वस्तू गरजू लोकांना द्यायची. घरातील वस्तू संपल्यानंतर नातेवाईकांना मागून तिने इतरांची गरज भागविली व पुढे हाच उपक्रम चालविला. वर्तमानपत्रातील या बातमीने मनात विचार आला की या उपक्रमाला सार्वजनिक रूप दिले तर, माझ्याकडे काही घड्याळी व भेट म्हणून मिळालेल्या वस्तू, मुलांच्या सायकली पडून आहेत. या वस्तू वसतिगृहातील मुलांना व कुण्याही गरजूंना उपयोगात येऊ शकतात. या भावनेतून हा उपक्रम सुरू केला व माई संस्थेने जबाबदारी स्वीकारली. अनेकांनी चांगल्या वस्तू आणूनही दिल्या. हे दुकान शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचावे. देणाऱ्यांचा ओघ वाढावा व गरज आहे त्यांनी घेऊन जावे, हीच या मागची भावना आहे.
- संदीप जोशी, अध्यक्ष लघु उद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य

Web Title: These items are not in our use, if you want it, take it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.