ठिय्या मंडपात घुसून विदर्भवाद्यांना व्हॅनमध्ये कोंबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:10 AM2021-08-13T04:10:04+5:302021-08-13T04:10:04+5:30
नागपूर : विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान आज गुरुवारी पोलिसांनी दुसऱ्यांदा कारवाई ...
नागपूर : विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान आज गुरुवारी पोलिसांनी दुसऱ्यांदा कारवाई केली. अर्धनग्न आंदोलनानंतर कार्यकर्ते जेवण करत असतानाच थेट मंडपात घुसून आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांना चौकापर्यंत पायदळ देत पोलीस व्हॅनमध्ये कोंबून पोलीस लाइन टाकळी येथे नेले.
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी विदर्भवाद्यांनी शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिराच्या परिसरात प्रचंड घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलनासोबतच दुपारी १.१५ वाजता अर्धनग्न आंदोलन केले. या दरम्यान पोलिसांचा मोठा ताफा मंडपात दाखल झाला. तीन व्हॅनही चौकात सज्ज होत्या. अटक करण्यासाठी आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा घोषणाबाजी झाली. अटक करा, मात्र त्यापूर्वी सर्वांना जेवण करू द्या, अशी विनंती मुख्य संयोजक राम नेवले, माजी आमदार ॲड. वामनराव चटप आदींनी केली. दरम्यान, मुकेश मासूरकर भोवळ येऊन पडल्यावर त्यांना उपचारासाठी नेल्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन बाहेर काढले.
या दरम्यान कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. रस्त्यावर बसून पोलिसांच्या कारवाईचा प्रतिकारही केला. मात्र पोलिसांनी कारवाई करीत व्हॅनमध्ये कोंबून पोलीस लाइन टाकळी येथे पुढील कारवाईसाठी नेले. यावेळी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. कारवाईनंतर पोलिसांनी मंदिराच्या परिसरात येऊन सर्व बॅनर, फलक जप्त केले. पेंडालही काढून नेला. मंदिरावर लावण्यात आलेला स्पीकरही जप्त केला.
आंदोलकांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याची ही या चौथ्या दिवसातील दुसरी वेळ आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा पोलिसांनी अशीच कारवाई करून सर्वांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर दुपारी सुटका झाल्यावर पुन्हा आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. बुधवारी तिसऱ्या दिवशी ९ कार्यकर्त्यांनी मुंडन करून सरकारचा आणि पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदविला होता.
...
मुकेश मासूरकर मंडपातच बेशुद्ध
अटकेसाठी पोलीस आले असल्याने कार्यकर्त्यांचे जेवण आटोपत असतानाच विदर्भ युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मुकेश मासूरकर अचानकपणे भोवळ येऊन पडले. यामुळे एकच धावपळ उडाली. प्रयत्नांनंतरही शुद्धीवर न आल्याने त्यांना बेशुद्धावस्थेतच ऑटोरिक्षामधून मेयोमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
...
आंदोलन थांबणार नाही : चटप, नेवले यांचा इशारा
पोलिसांच्या या कारवाईने विदर्भ राज्यासाठी सुरू असलेले आंदोलन थांबणार नाही. १५ ऑगस्टपर्यंत नियोजित आंदोलन आहे, ते सुरूच राहील, असा इशारावजा निर्धार मुख्य संयोजक राम नेवले आणि ज्येष्ठ नेते ॲड. वामनराव चटप यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले, विदर्भ निर्मितीसाठी आणि येथील जनतेच्या हक्कासाठी हे आंदोलन आहे. सरकारने दडपण आणण्याऐवजी वेगळे विदर्भ राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा करावा.
...