साखरपुडा उरकला; तरुणाचा बोहल्यावर चढण्यास अचानक नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 01:03 PM2021-08-02T13:03:57+5:302021-08-02T13:04:28+5:30
Nagpur News नागपूर येथील बीई झालेल्या उच्चशिक्षित तरुणीचा नवनीत बांगळकर याच्याशी विवाह निश्चित झाला. अशातच आता तरुणाने बोहल्यावर चढण्यास नकार दर्शविला. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलीस ठाणे गाठत अत्याचाराचा आरोप केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरबी रोड येथील एका २७ वर्षीय तरुणीशी आसगाव, ता. पवनी (जि. भंडारा) येथील एका तरुणाचा विवाह ठरला. २२ फेब्रुवारी २०२१ साखरपुडा झाला. ‘प्री वेडिंग’ शूटिंगही उरकले. अशातच आता तरुणाने बोहल्यावर चढण्यास नकार दर्शविला. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलीस ठाणे गाठत अत्याचाराचा आरोप केला आहे.
नवनीत अशोक बांगळकर (२८, रा. आसगाव, ता. पवनी) असे आरोपीचे नाव असून, याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर येथील बीई झालेल्या उच्चशिक्षित तरुणीचा नवनीत बांगळकर याच्याशी विवाह निश्चित झाला. साखरपुडा उरकल्यानंतर कोरोनाच्या कारणावरून १३ एप्रिल २०२१ आणि ३ मे २०२१ अशा विवाहाच्या दोन तारखा स्थगित करण्यात आल्या. दरम्यान, १ आणि २ जून रोजी नवनीत आणि तरुणी कऱ्हांडला परिसरातील जंगल रिट्रीट रिसॉर्ट मुक्कामी होते. त्यांच्यासमवेत नवनीतचे मित्र आणि कुटुंबीयसुद्धा या रिसाॅर्टवर सोबत होते. यादरम्यान नवनीतने जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.
दरम्यान, नवनीतने पीडित तरुणीशी लग्न करण्यास नकार दिल्याने रविवारी (दि.१) तरुणीने उमरेड पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदविली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि कलम ३७६(१), ४१७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत.