मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनातील 'ते' पहिले बलिदान

By आनंद डेकाटे | Published: August 4, 2023 06:15 AM2023-08-04T06:15:00+5:302023-08-04T06:15:01+5:30

मराठवाडा विद्यापीठ नामांतर शहीद दिन विशेष : पाच भीमसैनिक पोलिसांच्या गोळीबारात शहीद : 'त्या' घटनेला ४५ वर्षे पूर्ण

'They' are the first sacrifice in the movement to change the name of Marathwada University | मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनातील 'ते' पहिले बलिदान

मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनातील 'ते' पहिले बलिदान

googlenewsNext

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस होता ४ ऑगस्ट १९७८. त्या दिवशी नागपुरातील इंदोरा १० नंबर पूल येथे ५ भीम सैनिक पोलिसांच्या बेछुट गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासून हा दिवस प्रत्येक वर्षी नामांतर शहीद दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाला ४५ वर्षे पूर्ण झाली.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधान सभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात २७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या ठराव एकमताने पारित झाल्यानंतर मराठवाड्यातील दलितांवर हल्ले, जाळपोळ सुरू झाली होती. या अत्याचाराच्या निषेधार्थ पहिल्यांदा आंबेडकरी बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील जनता रस्त्यावर उतरली होती.

४ आगस्ट १९७८ रोजी आंबेडकरी समाजाचा उत्स्फूर्त मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला होता. या मोर्चातून परतत असलेल्या नागरिकांवर इंदोरा १० नंबर पूल येथे पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यात रतन लक्ष्मण मेंढे, किशोर बाळकृष्ण भाकळे, अब्दुल सत्तार बशीर, शब्बीर हुसेन फझल हुसेन हे शहीद झाले, तर गोळीबारात जखमी झालेल्या अविनाश अर्जून डोंगरे या ११ वर्षांच्या कोवळ्या मुलाचा रूग्णालयात मृत्यू झाला. असे ५ लोक नामांतरासाठी शहीद झाले होते.

पुढच्याच वर्षी महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबर १९७९रोजी नागपुरात नामांतराच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी पुन्हा विशाल मोर्चा काढला होता. त्या वेळीही पोलिसांनी पुन्हा गोळीबार केला. त्यात दिलीप सूर्यभान रामटेके, ज्ञानेश्वर बुधाजी साखरे, रोशन बोरकर व डोमाजी भिकाजी कुत्तरमारे हे ४ भीमसैनिक शहीद झालेनागपुरातील शहिदांसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी नामांतरासाठी २७ भीमसैनिक शहीद झाले. या शहीद झालेल्या भीमसैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इंदोरा १० नंबर पूल येथे उभारलेल्या स्मारकावर सर्व शहीद भीमसैनिकांची नावे कोरलेली आहेत. नामांतरासाठी प्रदीर्घ आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर ठरावाची अंमलबजावणी केली. तेव्हापासून १४ जानेवारीला नामांतर दिवस पाळला जातो.

नामांतर लढा एक जाज्वल्य इतिहास

नामांतर लढा म्हणजे देशाच्या सामाजिक समतेच्या चळवळीतील सुवर्णाक्षरात नोंदला गेलेला जाज्वल्य इतिहासच आहे. या आंदोलनाच्या उभारणीत आणि यशात नागपूर शहराचे बलिदान मोलाचे आहे. या चळवळीत आत्माहुती देणाऱ्या शहिदांच्या त्यामुळेच नामांतर साकार झाले आहे.

- अनिल वासनिक, नामांतर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते

Web Title: 'They' are the first sacrifice in the movement to change the name of Marathwada University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.