उपासमार थांबविण्यासाठी ते बनले देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:09 AM2021-05-12T04:09:11+5:302021-05-12T04:09:11+5:30
दिनकर ठवळे काेराडी : काेराेनाच्या वाढत्या संक्रमणामुळे गेल्या अनेक दिवसापासून सर्वत्र ‘देऊळ बंद’ आहेत. काेराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबेचे ...
दिनकर ठवळे
काेराडी : काेराेनाच्या वाढत्या संक्रमणामुळे गेल्या अनेक दिवसापासून सर्वत्र ‘देऊळ बंद’ आहेत. काेराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबेचे मंदिरही या काळात बंद आहे. यामुळे या परिसरात राहणाऱ्या भिकाऱ्यांची उपासमार हाेत हाेती. ही बाब लक्षात घेत भिकाऱ्यांची उपासमार थांबविण्यासाठी काेराडी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. मंदिर परिसरातील भिकाऱ्यांना दरराेज पाैष्टिक जेवण दिले जात आहे. ग्रामपंचायतीच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून काैतुक हाेत आहे.
काेराडी मंदिरात भाविकांकडून भिकाऱ्यांना अन्नदान केले जाते. यावर त्यांची उपजीविका चालत हाेती. परंतु मंदिर बंद असल्याने पैसे व अन्नरूपाने मिळणारी भिक्षा बंद झाली. यामुळे भिकाऱ्यांची उपासमार व्हायला लागली. ही बाब पाहता ग्रामपंचायतीने भिकाऱ्यांना भाेजन देण्याचे ठरविले. ३० ते ४० भिकाऱ्यांसाठी दरराेज जेवण करणे, त्यांच्यापर्यंत पाेहचविणे, वाढणे या प्रक्रियेसाठी मनुष्यबळ वा निधीची गरज हाेती. अन्नधान्य व किराणा उपलब्ध करून दिला जाईल, परंतु पुढील जबाबदारी कुणीतरी सामाजिक तत्त्वावर घ्यावी, अशी ग्रामपंचायतची अपेक्षा हाेती. अशास्थितीत ग्रामपंचायतीचे कंत्राटी कामगार दिलीप बांगरे यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास संमती दर्शविली. मागील वर्षीच्या कडक लाॅकडाऊननंतर काहीशी विश्रांती व एप्रिल महिन्यापासून पुन्हा सुरू झालेल्या निर्बंधाच्या काळात दिलीप बांगरे हे आपल्या कुटुंबीयांसह भिकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत.
ग्रामपंचायतकडून बांगरे यांना किराणा व भाजीपाला उपलब्ध करून दिला जातो. दिलीप बांगरे यांच्यासह पत्नी भागीरथा बांगरे, मुलगी वैष्णवी हे तिघेही दरराेज स्वत: स्वयंपाक करतात. त्यानंतर मंदिर परिसरात सर्व भिकाऱ्यांना जेवण दिले जाते. या कार्यात त्यांना रमेश मिरासे, अविनाश जनबंधू, गणेश मेश्राम, आकाश बाेरकर यांचीसुद्धा मदत मिळते. दिलीप बांगरे व रमेश मिरासे हे ग्रामपंचायतीचे कंत्राटी कामगार असून, त्यांच्याकडे पाणीपुरवठा व्यवस्थेचे काम आहे. नियमित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करून मंदिर परिसरातील भिकाऱ्यांना जेवण मिळावे, यासाठी ही मंडळी कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न जाता सेवाभाव करीत आहेत.
भिकाऱ्यांसाठी भाेजनाची व्यवस्था पाहून खापरखेडा, छत्रपूर येथील भिकारी या ठिकाणी जेवणासाठी येतात. कचरा, प्लास्टिक व लाेखंड गाेळा करणारे अनेक निराधार व्यक्ती येथे भाेजनासाठी येतात. या सर्वांना नियमित जेवण दिले जाते. यासाठी अन्नधान्याचा पुरवठा ग्रामपंचायत करीत असली तरी या सेवाकार्यात सामाजिक कार्यकर्ते भास्कर चिंचूरकर, जयेंद्र बरडे, किशाेर बरडे, मनाेज सावजी, नगरसेवक महेश धुळस, सरपंच नरेंद्र धानाेले आदींचे आर्थिक याेगदान आहे.