‘त्यांनी’ स्वबळावर फुलविला मळा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:08 AM2021-04-02T04:08:52+5:302021-04-02T04:08:52+5:30

सावनेर : पारंपरिक शेती पद्धती आणि निसर्गचक्रातील सततच्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात दशकभरापासून घट होताना दिसते. उत्पादन वाढीसाठी रासायनिक खताच्या ...

‘They’ blossomed on their own .... | ‘त्यांनी’ स्वबळावर फुलविला मळा....

‘त्यांनी’ स्वबळावर फुलविला मळा....

Next

सावनेर : पारंपरिक शेती पद्धती आणि निसर्गचक्रातील सततच्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात दशकभरापासून घट होताना दिसते. उत्पादन वाढीसाठी रासायनिक खताच्या माऱ्यामुळे जमिनीचा पोत घसरतो. अशात कर्जाचा वाढता भार, घटते उत्पादन यामुळे येणाऱ्या नैराश्यामुळे प्रसंगी शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करतात. मात्र शेतीला व्यावसायिक स्वरूप देत त्यातून उत्पन्नाचे स्रोत शोधणारे शेतकरीही आहेत. यात सावनेर तालुक्यातील कोच्छी येथील शेतकरी ज्ञानेश्वर दौलत बनसिंगे यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. बनसिंगे यांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारच्या वतीने त्यांना २०१९ वर्षाचा उद्यानपंडित पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर बनसिंगे यांच्या कार्याचा लोकमतने घेतलेला हा आढावा.

पारंपरिक शेती परवडत नसल्याने आपण उद्यान शेतीचा पर्याय स्वीकारला. यात कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळते. मोसंबी आणि सीताफळ बागेतून वर्षाला चार लाख उत्पन्न झाले असे सांगताना सध्याच्या बिकट स्थितीत उद्यान शेती शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते, असे बनसिंगे सांगतात. २००४ पासून बनसिंगे यांनी उद्यानशेतीचा मंत्र जोपासला आहे. उद्यानशेतीतून कमी खर्चात अधिक उत्पन्न होते. महागडे खत आणि फवारणीची गरज नाही. फक्त शेणखत आणि पाऊस पडल्यावर गूळ आणि गोमूत्राची फवारणी करावी, असाही सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

बनसिंगे सध्या सीताफळाच्या झाडापासून एकरी एक लाख रुपये उत्पन्न घेत आहेत. यात आणखी वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. यासोबतच सांगोला येथून त्यांनी अ‍ॅपल बोरची झाडे आणली. या १० झाडांपासून त्यांनी वार्षिक १० हजाराचे उत्पन्न मिळत आहे. रेशीमबाग (नागपूर) येथील कृषी प्रदर्शनातून उद्यानशेतीबाबत प्रेरणा मिळाल्याचे बनसिंगे यांनी सांगितले. आता त्यांच्यापासून प्रेरणा घेत परिसरातील अविनाश बनसिंगे, प्रमोद बनसिंगे, गौरव बागडे, प्रकाश भांडारे, भीमराव मांडवगडे यांनी उद्यानशेतीचा पर्याय स्वीकारला आहे.

अशी आहे बनसिंगे यांची उद्यानशेती

ज्ञानेश्वर बनसिंगे यांच्याकडे १० एकर शेती आहे. यात त्यांनी तीन एकरात सीताफळाची ११०० झाडे लावली आहेत. एक एकरात १०० मोसंबीची झाडे तर ५ विविध प्रकारची पेरूची झाडे आहेत. यासोबतच त्यांच्याकडे संत्र्यांची ५५० झाडे आहेत. ड्रीप पद्धतीने ते सिंचन करतात.

Web Title: ‘They’ blossomed on their own ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.