देशी दारूच्या दुकानात हफ्तावसुलीसाठी आले अन ग्राहकालाच लुटून पळाले
By योगेश पांडे | Published: November 26, 2023 04:44 PM2023-11-26T16:44:47+5:302023-11-26T16:45:38+5:30
नागपूर : देशी दारूच्या दुकानात हफ्तावसुलीसाठी आलेल्या आरोपींनी एका ग्राहकालाच लुटून पळ काढला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना ...
नागपूर : देशी दारूच्या दुकानात हफ्तावसुलीसाठी आलेल्या आरोपींनी एका ग्राहकालाच लुटून पळ काढला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.
राजीवनगर स्मशानघाटावजळ देशी दारूचे दुकान आहे. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तेथे अक्षय दयाराम सूर्यवंशी (२४, राजीवनगर), आकाश उर्फ राहुल कमलेश सिंग (२४, राजीवनगर), आतीश गरीबदास शेंडे (२५, वैशालीनगर), सोनू उर्फ वसीम रफीक खान (२२, राजीवनगर), तुषार गणेश पेंदाम (२३, गोंड मोहल्ला) हे आरोपी पोहोचले. त्यांनी चाकू दाखवत दुकानातील कर्मचाऱ्यांना हफ्ता मागितला.
जर दुकान चालवायचे असेल तर खंडणी द्यावी लागेल असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकावले. त्यावेळी तेथे संजय शेंडे (४०) हे ग्राहक उभे होते. आरोपींनी त्यांना चाकू दाखविला व त्यांच्या पॅंटच्या खिशातून साडेचार हजार रुपये हिसकावून पळ काढला. जर पोलिसांकडे तक्रार केली तर जीवे मारू अशी धमकीदेखील दिली. त्यानंतर आरोपी पळून गेले. शेंडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला व पाचही जणांना अटक केली.