बेवारस श्वानांना ‘ते’ खाऊ घालतात रोज अन्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:10 AM2021-08-29T04:10:25+5:302021-08-29T04:10:25+5:30
नागपूर : रस्त्यावर भटकणारे बेवारस श्वान म्हणजे उपेक्षेचे धनी ! मात्र या मुक्या जीवांची काळजी घेत त्यांना रोज अन्न ...
नागपूर : रस्त्यावर भटकणारे बेवारस श्वान म्हणजे उपेक्षेचे धनी ! मात्र या मुक्या जीवांची काळजी घेत त्यांना रोज अन्न शिजवून खाऊ घालण्याचा उपक्रम अरविंदकुमार रतुडी यांच्या नेतृत्वात मागील ५ ते ६ वर्षांपासून सुरू आहे. जागतिक श्वान दिवसाचे औचित्य साधून गुरुवारी सायंकाळी किंग कोबरा ऑर्गनायझेशन यूथ फोर्स आणि ‘पशु क्रूरता के खिलाफ जंग’ या संस्थांच्या वतीने कार्यकर्त्यांनी बेवारस श्वानांना शोधून ममतेने खाऊ-पिऊ घातले.
या संस्थांचे अध्यक्ष अरविंदकुमार रतुडी मागील पाच ते सहा वर्षांपासून रोज सकाळ-सायंकाळी घरी अन्न शिजवून भटक्या, जखमी कुत्र्यांना खाऊ घालतात. ओमनगर, सक्करदरा, सुदामपुरी, नेहरूनगर या परिसरातील चौकात आणि गल्लीबोळात राहणाऱ्या श्वानांना अन्न खाऊ घालण्याचा त्यांचा हा उपक्रम अखंड सुरू आहे. यात त्यांच्या कुटुंबपयांचाही सहभाग असतो. श्वान दिनी अन्न, बिस्कीट, पिलांना दूध पाजून त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ही सेवा दिली. यात मधै डोये, अनिल मोहित, रिषी राज भुते, शिवम तिबोले, आयुष कडू, आयुषी रतुडी, फाल्गुनी रतुडी आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता. या संस्थेच्या वतीने दिवाळीसारख्या सणामध्ये बेवारस कुत्र्यांना आणि मुक्या जनावरांना अन्न खाऊ घातले जाते. त्यासाठी नागरिकांना अन्नदानाचे आवाहन हे कार्यकर्ते करत असतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संक्रमणामुळे मृत पावलेल्या १,३०० व्यक्तींवर त्यांनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले होते. या कार्यासाठी मनपाने त्यांचा सत्कारही केला होता....
वाचलेले अन्न कुत्र्यांना द्या
या उपक्रमासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना अरविंदकुमार रतुडी म्हणाले, प्रत्येकाच्या घरी अन्न वाचते. ते फेकून न देता घरासमोर भांड्यात ठेवा. भुकेलेली मुकी जनावरे ते खातील. हे मुके प्राणीही समाजाचा एक भाग आहेत. त्यांनाही जगण्याचा हक्क आहे. अन्नाला जागून ते रात्री रखवाली करतात. त्यांना छळू नका.
...