रेल्वे स्टेशनवर बॅग विसरले, पण कुलींनी मालकाला शोधून काढले

By नरेश डोंगरे | Published: November 13, 2023 06:20 PM2023-11-13T18:20:00+5:302023-11-13T18:22:17+5:30

मुख्य रेल्वेस्थानक : प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय

They forgotten the bag at the railway station, but the coolie found the owner and returned it | रेल्वे स्टेशनवर बॅग विसरले, पण कुलींनी मालकाला शोधून काढले

रेल्वे स्टेशनवर बॅग विसरले, पण कुलींनी मालकाला शोधून काढले

नागपूर : तुफान गर्दीमुळे कुणाला कुणाकडे बघायला वेळ नाही. प्रत्येकाची नजर आपल्या गावाला जाणाऱ्या गाडीकडे आणि आलेल्या गाडीत आसन कसे मिळेल त्याकडे लागलेले. अशात रेल्वेस्थानकावर काही कुली मात्र ग्राहक सोडून एका बॅगमालकाला शोधत होते. अखेर त्यांची शोधाशोध फळाला आली आणि बॅगमालक भेटला. त्याला त्याची बॅग सोपवून कुली आपल्या कामात गुंतले. सोमवारी दुुपारी १.४५ वाजताच्या सुमारास येथील मुख्य रेल्वे स्थानकावर 'प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय' देणारी ही घटना घडली.

येथील एका सुखवस्तू कुटुंबाला दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्या दिल्लीतील नातेवाईकांकडे जायचे होते. त्यांची गाडी विशाखापट्टनम - दिल्ली वेळेवर म्हणजेच दुपारी २.१५ ला येणार होती. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हे कुटुंबं आज अर्धा तास अगोदरच रेल्वेस्थानकावर पोहचले. दुसऱ्या अन्य गाड्या फलाटावर येणे जाणे सुरू असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यामुळे या फलाटावरून त्या फलाटावर जाण्याच्या प्रयत्नात फलाट क्रमांक १ वर एका कुटुंबाची एक बॅग राहून गेली.

दरम्यान, दुसऱ्या गाड्या निघून गेल्यानंतर फलाटावरची गर्दी कमी झाली. एका कोपऱ्यात एक बॅग (सुटकेस) बराच वेळेपासून पडून असल्याचे फलाट क्रमांक १ वर असलेले सोनू गायकवाड, नफिस अहमद आणि अब्दुल मजिद नामक कुलींच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बॅगजवळ जाऊन आजुबाजुच्या प्रवाशांना 'ही' बॅग कुणाची आहे, अशी विचारणा केली. प्रत्येकानेच अनभिज्ञता दाखविल्याने सोनू गायकवाड, नफिस अहमद आणि अब्दुल मजिद सक्रिय झाले. त्यांनी अनाऊंसमेंट रुममध्ये जाऊन बॅग बाबत माहिती दिली. उद्घोषणा झाली मात्र कुणीच प्रतिसाद दिला नाही.

ईकडे दुसऱ्या गाड्यांसह विशाखापट्टनम - दिल्ली एक्सप्रेस येण्याची वेळ जवळ आली होती. त्यामुळे फलाटावर प्रवाशांची गर्दी वाढत होती. परिणामी सोनू, नफिस आणि अब्दुल मजिद रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) ठाण्यात पोहचले. त्यांनी बेवारस बॅगबाबत माहिती दिली. त्याचवेळी आपली बॅग हरविल्याची तक्रार करण्यासाठी बॅगमालक तेथे आले. त्यांनी बॅगचे वर्णन सांगितले अन् सोनू, नफिस आणि अब्दुल मजिद या तिघांनी आरपीएफ जवानांच्या माध्यमातून त्यांची बॅग त्यांना परत केली. बॅगमालकाने कुलींप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना बक्षिस देण्याची तयारी दाखविली. त्यांचा नम्र नकार ऐकून त्यांना धन्यवाद दिले.

प्रसंगावधानामुळे दहशत नाही

एरव्ही गर्दीच्या ठिकाणी बेवारस बॅग आढळली की आजुबाजूची मंडळी अतिउत्साह दाखवत तर्कवितर्क लावतात. रेल्वे स्थानकासारखे ठिकाण असेल तर बघायलाच नको. येथे लगेच बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरते. परिणामी प्रवाशांमध्ये दहशत निर्माण होते. मात्र, सोनू, नफिस आणि अब्दुल मजिद यांनी प्रसंगावधान राखत योग्य ते पाऊल उचलल्याने आज अफवा पसरली नाही अन् प्रवाशांत दहशतही निर्माण झाली नाही.

Web Title: They forgotten the bag at the railway station, but the coolie found the owner and returned it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.