त्यांनी दिला नवा आदर्श
By Admin | Published: March 9, 2016 03:21 AM2016-03-09T03:21:07+5:302016-03-09T03:21:07+5:30
मंगळवारचा दिवस शहर पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांच्या नावे होता. महिलांच्या हाती पाळण्याची दोरी...
नागपूर : मंगळवारचा दिवस शहर पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांच्या नावे होता. महिलांच्या हाती पाळण्याची दोरी... या प्रचलित उक्तीला बाजूला सारून आज शहर पोलीस दलातील महिलांनी चक्क पोलीस ठाण्याची धुरा सांभाळली.
पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांच्या निर्देशानुसार उपराजधानीतील पोलीस ठाण्यांमध्ये ठाणे अमलदार म्हणून महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या हातात धुरा देण्यात आली. ठाणेदार त्यांना मार्गदर्शन करीत होते. प्रभारी महिला पोलीस अमलदारांनी दिवसभरात चोऱ्या, हाणामाऱ्यांपासून विविध प्रकारचे गुन्हे हाताळले. अनेक घटनास्थळी जाऊन परिस्थिती सांभाळली अन् आरोपींच्या मुसक्या बांधून त्यांना कोठडीतही टाकले. तक्रारी घेऊन आलेल्या काही जणांच्या तक्रारी नोंदवून गुन्हे दाखल करतानाच काही तक्रारदारांचे समुपदेशनही केले. कळमना, सोनेगाव, यशोधरानगर, सोनेगाव आणि कोतवाली ठाण्यात महिलांशी संबंधित काही नाजूक तक्रारी आल्या. त्यासंदर्भातही तातडीचे निर्णय घेत तक्रारदारांना न्याय देण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी प्रशंसनीय भूमिका वठवली.
प्रकरण : एक
कळमना : पोलीस
उपनिरीक्षक छाया गुजर
शाळेत जाणाऱ्या एका मुलीचा (वय १४) एक सडकछाप मजनू काही दिवसांपासून पाठलाग करीत होता. मुलीने त्याला दाद दिली नाही अन् पालकांकडेही तक्रार केली नाही. त्यामुळे तो निर्ढावला. आज दुपारी तो थेट तिच्या घरात आला. मुलीचा हात धरला अन् ‘सांग तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही’, अशी त्याने विचारणा केली. मुलगी भांबावली. तिने नकार देताच आरोपीने तिचा हात पिरगळला अन् तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. मुलीने आरडाओरड केल्यामुळे आई, बहीण, आजी धावत आली. त्यांना पाहून आरोपी पळून गेला. बराच वेळ विचार विमर्श केल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी काहीसे घाबरतच कळमना पोलीस ठाणे गाठले. एवढे होऊनही तक्रार देण्याची त्यांची मानसिकता नव्हतीच. मात्र, त्यांची कैफियत ऐकल्यानंतर उपनिरीक्षक छाया गुजर यांनी त्यांना हिंमत दिली. विनयभंगाची तक्रार नोंदवून घेतली. गुन्हा दाखल केल्यानंतर लगेच गुन्हे प्रकटीकरण पथकाला आरोपीच्या मुसक्या बांधण्यासाठी रवाना केले.
प्रकरण : दोन
चार वर्षांपूर्वी घरच्यांचा, समाजाचा विरोध झुगारून दोघांनी एकमेकांची साथ जोडली. ‘जिना मरना संग संग’ अशी शपथ घेत ते एक झाले. त्यांना दोन वर्षांचा गोंडस मुलगा आहे. मात्र आता प्रेम ओसरल्यासारखे ती वागत आहे. त्याच्यावर नको ते आरोप लावत आहे. त्याच्यासोबत राहण्याऐवजी माहेरी जाण्याचा हट्ट धरून ती पोलीस ठाण्यात पोहचली. तिने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे ‘त्याला’ समोरासमोर केल्यावर स्पष्ट झाले.
तरीसुद्धा त्याच्यासोबत राहायचेच नाही अन् घटस्फोटही द्यायचा नाही, अशी एककल्ली भूमिका तिने स्वीकारली होती. तिच्या या भूमिकेमुळे दोष नसताना तो आपल्या चिमुकल्यापासून दुरावत होता. उपनिरीक्षक गुजर यांनी आपल्या वरिष्ठांचा सल्ला घेतला अन् गुन्हा दाखल करण्याऐवजी त्या दोघांचेही समुपदेशन केले. ‘जाऊ दे हिला माहेरी. राग शांत झाला की परत येईल आपोआप’, अशी त्याची समजूत काढली. तो मानला अन् ती माहेरी गेली.
कोतवाली : हवालदार संगीता यादव
प्रकरण : तीन
घरात लग्नाची तयारी सुरू आहे. आप्तस्वकीयांची लगिनघाई सुरू असताना ती मात्र प्रियकरासह पळून गेली. हादरलेल्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवली. भाऊ कोतवाली पोलीस ठाण्यात आला. पोलिसांनी तिला ठाण्यात आणले. महिला पोलिसांनी तिचे समुपदेशन केले. तिला खाचखळगे समजावून सांगितले. स्वप्न, धुंदी अन् वास्तवातील फरक तिच्या लक्षात आणून दिला. ती समजली अन् अखेर भावासोबत घरी परतली.
सोनेगाव : उपनिरीक्षक दीपाली राऊत
प्रकरण : ४
घर म्हटले की भांड्याला भांडे लागणारच. मात्र, दोन्ही भांडी एकमेकांवर आदळली की ती फुटणार. पती-पत्नीच्या नात्याचे असेच आहे. दोघांकडूनही अहंकारी भूमिका घेतली गेली तर त्यांची ताटातूट होऊन संसाराची वाट लागू शकते. असेच एक प्रकरण आज सोनेगाव ठाण्यात पोहोचले. पती-पत्नी एकमेकांचे गाऱ्हाणे मांडू लागले. पोलिसांनी त्यांचे ऐकून घेतल्यानंतर त्यांचे प्रभावीपणे समुपदेशन केले. परिणाम चांगला झाला. तक्रार करण्यासाठी अन् एकमेकांपासून दूर जाण्यासाठी निघालेले हे दोघे आपाल्या घरी परतले. (प्रतिनिधी)