'ते' वाढदिवस, लग्नसाेहळ्यात भेट देतात राेपटी; आजवर केले दीड हजार वृक्षांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 08:02 PM2021-12-10T20:02:01+5:302021-12-10T20:02:32+5:30
Nagpur News जमेल तसे व जमेल तिथे जाऊन वृक्ष भेट देणे किंवा त्यांचे रोपण करणे असा छंद असलेले एक अवलिया नागपुरात आहेत. वृक्षमानव अशी ओळख असलेले राजिंदरसिंग पलाहा हे फार्मसी महाविद्यालयात कार्यरत आहेत.
नागपूर : जाताना आपण या जगाला काय देऊन जाणार, असा प्रश्न केला की अनेकांना प्रश्न पडेल. राजिंदरसिंग यांनी त्या प्रश्नाच्या उत्तराची तजवीज केली आहे. भविष्यातील असंख्य वर्ष आली पृथ्वी, हे जग असेच हिरवेगार राहावे म्हणून झाडांची राेपटी भेट देणे व जिथे जमेल तिथे वृक्षाराेपण करण्याला त्यांनी आयुष्याचे ध्येय बनविले आहे.
मिसाळ ले-आऊट, जरीपटका येथील रहिवासी राजिंदरसिंग पलाहा असे या औलियाचे नावे असून ते कामठी राेडवरील फार्मसी काॅलेजमध्ये सेवारत आहेत. त्यांच्या परिचितांमध्ये ते वृक्षमानव म्हणून प्रसिद्ध आहेत. एखाद्याचा वाढदिवस असेल, लग्नसमारंभ असेल किंवा गृहप्रवेशाचा कार्यक्रम राजिंदरसिंग तेथे पाेहचतात ते झाडांची राेपटी घेऊनच. ही राेपटी उभयतांना नुसती भेट देऊन ते थांबत नाही तर इतरांकडून दुर्लक्ष हाेण्यापूर्वी ते स्वत:च वृक्षाराेपण उरकून घेतात. आतापर्यंत हजाराे लाेकांना त्यांनी वृक्षभेट दिली आहे. स्वत: वृक्षाराेपण करण्याचा आकडाही कमी नाही. त्यांनी परिचितांकडे व इतर ठिकाणी १३०० च्यावर झाडांची लागवड केली आहे.
काेराडी राेडवर जाताना ज्या झाडाखाली ते काही वेळ विसावा घेत. एकदा असाच त्या मार्गावर प्रवास करताना ते माेठे झाड व त्याच्या आसपासची झाडे काही विकासकामासाठी त्यांना कापलेली दिसली. त्यांना फार वाईट वाटले. त्याच वेळी शक्य हाेईल तसे वृक्षाराेपण करण्याचा निर्धार त्यांनी घेतला. यापुढे ते कुठल्याही मार्गाने प्रवासाला निघाले की त्या मार्गावर ते वृक्षाराेपण करणारच. हा त्यांचा नित्यक्रम झाला. त्यांच्या घराच्या आसपास, महाविद्यालय परिसरात त्यांनी अनेक झाडांची लागवड केली व त्यांचे संवर्धनही केले. त्यांनी लावलेली झाडे आज दिमाखात उभी आहेत. त्याहीपुढे जाऊन कुठल्याही समारंभात इतर भेटवस्तू देण्यापेक्षा झाडे भेट देण्याचे सत्र त्यांनी सुरू केले. त्यांचा हा उपक्रम हिट ठरला. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेली साथही माेलाची ठरली. पृथ्वी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आज वृक्षाराेपणाची गरज आहे आणि राजिंदरसिंग हे त्यांचे कर्तृत्व पार पाडत आहेत.