प्रमाणपत्रासाठी त्यांनी ग्रामसभेत केले लग्न !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 07:45 PM2018-08-24T19:45:51+5:302018-08-24T19:48:33+5:30

महिला बचत गटांच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या अरेरावीपणामुळे ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याची घटना ताजी असताना नरखेड तालुक्यातील जलालखेडा ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे त्रस्त असलेल्या एका जोडप्याने विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र मिळण्यात होत असलेल्या प्रकाराचा निषेध करीत ग्रामसभेपुढे पुन्हा एकदा लग्न केले.

They got married in the Gram Sabha for the certificate! | प्रमाणपत्रासाठी त्यांनी ग्रामसभेत केले लग्न !

प्रमाणपत्रासाठी त्यांनी ग्रामसभेत केले लग्न !

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील जलालखेडा ग्रामपंचायतीतील प्रकार : प्रशासनाविरुद्ध नागरिकांचा रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला बचत गटांच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या अरेरावीपणामुळे ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याची घटना ताजी असताना नरखेड तालुक्यातील जलालखेडा ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे त्रस्त असलेल्या एका जोडप्याने विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र मिळण्यात होत असलेल्या प्रकाराचा निषेध करीत ग्रामसभेपुढे पुन्हा एकदा लग्न केले.
जलालखेडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा गुरुवारी पार पडली. तीत स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांना वेळेवर प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे, कागदपत्रांसाठी वारंवार बोलाविणे, नियमाची अट टाकत वेठीस धरणे अशा शेकडो समस्यांचा पाढा आमसभेत ग्रामस्थांनी वाचला. यात गावातील नवविवाहित युवक-युवतींचे लग्नाची नोंदणी न करणे अशा कित्येक कारणाने ग्रामस्थ त्रस्त आहेत. यातच एक नवविवाहित जोडपे सुरेंद्र निकोसे यांचा अश्विनी यांच्याशी एक महिन्यापूर्वी मंदिरात व निबंधकाकडे रीतसर विवाह झाला होता. तरी ग्रामपंचायत त्यांच्या विवाहाची नोंदणी करीत नसल्यामुळे या नवविवाहित जोडप्याने खंड विकास अधिकारी व ग्रामस्थांपुढे ग्रामसभेतच एकमेकांना वरमाला टाकून विवाह केला आणि आता तरी ग्रामपंचायतने लग्न केल्याचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली.

‘ग्रामविकास अधिकारी हटाव’चा नारा
नरखेड पं.स.चे खंडविकास अधिकारी दयाराम राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्राम विकास अधिकारी लोलुसरे हटाव जलालखेडा बचावचा नारा बुलंद केला. गावातील महिलांनी लोलुसरे यांच्या कृत्याचा पाढाच खंडविकास अधिकाऱ्यासमोर वाचला.

आजी व माजी आमदार ग्रामसभेत
जलालखेडा ग्रा.पं.च्या या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच या क्षेत्राचे माजी आमदार अनिल देशमुख व विद्यमान आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी गंभीर दखल घेत सरळ जलालखेडा ग्रा.पं.ची सुरू असलेली आमसभा गाठली. त्यांच्या समोरही उपस्थित महिलांनी व ग्रामवासीयांनी सचिवाच्या अभद्रपणाचा व वेठीस धरण्याच्या कार्यप्रणालीचा पाढा वाचला.

महिलेने विकले दागिने
गावातील एका महिलेस मुलाच्या शिक्षणाकरिता बीपीएल प्रमाणपत्र दाखल्याची गरज होती. तिने चालू वर्षाचा घर कर न भरल्याने तू आधी कर भर नंतर तुला दाखला देतो असे सचिव लोलुसरे यांनी तिना सांगितले व दाखला देण्याकरिता टाळाटाळ केली पण परिस्थितीमुळे ती महिला चालू वर्षाचा घर कर भरण्यास सक्षम नव्हती. घर कर भरला नाही तर प्रमाणपत्र मिळत नाही व प्रमाणपत्र मिळाले नाही तर मुलाचे शैक्षणिक वर्ष वाया जाते ही परिस्थिती असूनसुद्धा लोलुसरे यांना त्या महिलेची कसलीही दया आली नाही. शेवटी त्या महिलेला आपले दागिने विकून घर कर भरावा लागला नंतरच लोलुसरे यांनी तिला बीपीएलचा दाखला दिला.

Web Title: They got married in the Gram Sabha for the certificate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.