'त्यांनी' बनवले ७ तासात फुलांचे १०७ मुकूट; इंडियासह आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 09:35 PM2021-12-27T21:35:35+5:302021-12-27T21:36:13+5:30
Nagpur News स्वाती प्रवीण गादेवार यांनी ७ तासात फुलांचे १०७ मुकुट तयार करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नामांकन मिळविले आहे.
नागपूर : रेकॉर्डच्या बाबतीत नागपूरच्या मुकुटात पुन्हा एक मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. स्वाती प्रवीण गादेवार यांनी हा मान मिळवून दिला आहे. स्वाती यांचा हा रेकॉर्ड अफलातून असून, त्यांनी ७ तासात फुलांचे १०७ मुकुट तयार करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नामांकन मिळविले आहे.
यावेळी इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्डसचे नॅशनल एडजुरिकेटर मनोज तत्त्ववादी यांनी त्यांना मेडल आणि प्रमाणपत्र प्रदान केले. स्वाती गादेवार ह्या फ्लॉवर आर्टिस्ट आहे. ५२ प्रकारचे दागिने त्या फुलांपासून तयार करतात. फुलांच्या कलाकृती तयार करण्याची आवड असल्याने त्याचाही रेकॉर्ड होऊ शकतो, याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. सोमवारी सकाळी ७.३० पासून त्यासाठीचा प्रयत्न सुरू झाला. चिटणवीस सेंटरच्या बनियान हॉलमध्ये घडाळाच्या काट्यावर कॅमेऱ्यांनी एक एक मुकुट साकारताना त्यांचे गतिचित्र रेकॉर्ड केले. सोबतच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घरच्या मंडळीसोबतच मित्र, मैत्रिणी आणि अनाथालयातील मुलीही सहभागी झाल्या. सात तास सलग कुठलाही ब्रेक न घेता त्यांनी फुलांचे १०७ मुकुट तयार केले.
- पहिले इंडिया नंतर आशिया बुक ऑफ रेकॉर्ड झाला
स्वाती यांनी ७ तासाचे टार्गेट ठेवले होते. यात त्यांनी ५ तास ४१ मिनिट ४१ सेकंदांमध्ये ९० मुकुट तयार केली. त्यासाठी त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. पुढे १०० मुकुट त्यांनी ६ तास २२ मिनिट १८ सेकंदात पूर्ण केली. त्याला आशिया बुक ऑफ रेकॉर्डचे मानांकन मिळाले. ७ तास पूर्ण होईपर्यंत त्यांचे १०७ मुकुट तयार झाले होते.
- ७४९ फुलांची गुंफण
एका मुकुटात त्यांनी ७ फुलांची गुंफण केली. रेशमी धाग्यांनी फुलांची गुंफण करून अवघ्या काही मिनिटातच त्याचा डिस्प्ले केल्या जायचा. १०७ मुकुटांना ७४९ फुले लागली. ही सर्व मुकुट त्यांनी या रेकॉर्डच्या साक्षीदार असलेल्या आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या महिला, मुलींना अर्पण केले.
- श्रद्धानंद अनाथालयातील मुलींना दिली वाढदिवसाची भेट
आज स्वाती गादेवार यांचा ५० वा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांनी या विक्रमासाठी तयार केलेले मुकुट म्हणजेच ‘फुलों के ताज’ श्रद्धांनद अनाथालयातील मुलींच्या डोक्यावर चढवून वाढदिवसाची अनोखी भेट दिली. सोबतच महिला सबलीकरणाचा संदेशही दिला.