न केलेल्या गुन्ह्याची ‘त्यांनी’ भोगली शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:52 AM2019-03-18T10:52:25+5:302019-03-18T10:54:37+5:30
नवीन वर्षाचा तिसरा दिवस निघाला. ते आपल्या रोजीरोटीसाठी धावपळ करीत होते. भविष्याने समोर काय वाढून ठेवले, त्याची त्यांना कल्पना नव्हती अन् काळजीही नव्हती.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन वर्षाचा तिसरा दिवस निघाला. ते आपल्या रोजीरोटीसाठी धावपळ करीत होते. भविष्याने समोर काय वाढून ठेवले, त्याची त्यांना कल्पना नव्हती अन् काळजीही नव्हती. आजच्या दोन वेळेच्या भाजीभाकरीची व्यवस्था करण्यासाठी शक्य होईल तेवढे परिश्रम घेण्याची त्यांची वर्तमानात तयारी होती. त्यांची दिवसभराची दगदग सुरू असतानाच अचानक पोलिसांचा ताफा त्यांना शोधत पोहचला. आधी एकाची आणि नंतर दुसऱ्याची गचांडी पकडण्यात आली. काही तरी गैरसमज झाला असावा, तो लवकर दूर होईल आणि आपण आपल्या घरी पोहचू, असा त्यांचा समज होता. मात्र, तो गैरसमज ठरला. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांना बदड बदड बदडण्यात आले. दुसरा, तिसरा आणि अन्य साथीदार कुठे आहे, अशी विचारणा होऊ लागली. त्यांना काही कळेचना. कसले साथीदार, कुठले साथीदार, असे ते विचारत होते. मात्र, ते बनाव करीत असल्याचा समज झाल्याने पोलीस त्यांना ठोकत होते. तसे पाहता पोलिसांचाही काही दोष आहे, असे समजण्याचे कारण नव्हते. कारण एका सुस्वरूप विवाहितेने त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप लावला होता. आरोप होता सामूहिक बलात्काराचा!
पती दारूच्या नशेत टून्न असताना छोटेबाबा शेख आणि बंटी श्रीवास नामक पतीचे मित्र नाश्ता घेऊन घरी आले. त्यांच्याकडून तो नाश्ता खाल्ला अन् गुंगी आली. जेव्हा शुद्ध आली तेव्हा पतीचा एक मित्र बलात्कार करीत होता. त्याने कुकर्म केल्यानंतर दुसऱ्याने मोबाईलमध्ये व्हिडीओ क्लीप दाखवली. त्यात आपल्यावर बलात्कार करताना एक जण दिसत होता. बलात्काराबाबत कुठे वाच्यता केल्यास ही व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी आरोपींनी धमकी दिली. त्यामुळे मी गप्प बसले. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून हे दोघे आलटून पालटून नेहमी बलात्कार करू लागले. अनेकदा ते त्यांचे अनोळखी मित्र घेऊन येत होते. या दोघांव्यतिरिक्त पाच ते सहा जणांनी आपल्यावर अत्याचार केला. प्रत्येकवेळी अनोळखी व्यक्ती शरीरसंबंध प्रस्थापित करायचा अन् विरोध केल्यास छोटे बाबा तसेच बंटी श्रीवास अश्लील व्हिडीओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी द्यायचे. तीन महिन्यांपासून आपण या त्यांच्याकडून नरकयातना भोगत असून, आता मात्र सहन होत नाही. त्यामुळे मी तक्रार करीत असल्याचे तिने गणेशपेठ पोलिसांना २४ डिसेंबर २०१८ ला दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. तब्बल सात ते आठ जणांनी एक-दोन वेळा नव्हे तर तीन महिने एका नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार असल्याने पोलिसांना छोटेबाबा आणि बंटीला बदडून त्यांच्याकडून गुन्ह्याची तसेच अन्य कथित गुन्हेगारांची सविस्तर माहिती घेणे भाग होते. त्यामुळे यात पोलिसांचा दोष नव्हताच. त्याचमुळे पोलिसांनी त्यांना गुन्हा दाखल झाल्याच्या काही तासातच अटक केली. त्यांचा पीसीआर मिळवला. पीसीआरमध्येही बाजीरावसह सर्व काही देऊनही छोटेबाबा अन् बंटीकडून गुन्ह्याची कबुलीच काय, साधा सुतभर पुरावा मिळाला नाही. दोघांच्या बयाणातही विसंगती नव्हतीच. तक्रारदाराकडून मात्र वारंवार विसंगत माहिती पुढे येत होती.
घटनास्थळ एक कोंदट आणि निमुळती खोली होती. रस्त्यावरच घर होते. दिवसाढवळ्याच काय रात्रीला देखिल असे काही घडत असेल तर आजूबाजूंच्यांना त्याची चाहूल लागेल, असाच अंदाज येत होता. त्यातल्या त्यात पती बाजूला (दारूच्या नशेत) झोपून असताना सर्व प्रकार वारंवार घडत असल्याचे कथन पोलिसांच्याही पचनी पडत नव्हते. मात्र, आरोप गंभीर होता. त्यामुळे आरोपींची अटक, पीसीआर, मोबाईलसह कपडे जप्तीची सर्व प्रक्रिया पार पडली. परंतु कुठलाही पुरावा, या दोघांच्या विरोधात जात नव्हता. त्यामुळे पोलीस बुचकळ्यात पडले.
गँग रेपसारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी बनविले गेल्यामुळे आणि पाठ सोलली गेल्याने हे बिचारे दोघे कमालीचे दहशतीत आले होते. तेच काय, समाजासोबत बदनामीमुळे त्यांचे कुटुंबीयही त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने बघत होते. ते बिचारे ‘आम्ही काहीच केले नाही, आम्ही काहीच केले नाही’ म्हणून ओरडून ओरडून सांगत होते. त्यांची ओरड निरर्थक ठरली. पोलिसांनीही अत्यंत कसून चौकशी केली अन् नंतर आपल्या हातून अनवधानाने चूक झाली, हे त्यांच्या लक्षात आले. सामूहिक बलात्कार झालाच नाही, छोटेबाबा अन् बंटी आरोपी नाही तर निर्दोष आहे, हे चौकशी करणाºयासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही लक्षात आले. तोपर्यंत हे दोघे न्यायालयीन कस्टडीत अर्थात कारागृहात पोहचले होते.
कारागृहातील विश्व वेगळे असते. गुन्हेगारांची वस्ती समजल्या जाणाऱ्या कारागृहातही गुन्हेगारांची आपली सत्ता चालत असते. कोणत्या गुन्ह्यात आरोपी आला, त्याच्या गुन्ह्याचे स्वरूप कसे आहे, ते पाहून आतमधील गुन्हेगार नव्या आरोपींची ट्रीटमेंट करीत असतात. त्यामुळे छोटेबाबा आणि बंटी कारागृहात बलात्काराचे आरोपी म्हणून पोहचताच त्यांना तेथेही नको त्या शिक्षेला सामोरे जावे लागले.
भेसूर भिंतीपुढे त्यांनी मांडली व्यथा
आपण काहीच केले नाही, असे छोटेबाबा अन् बंटी प्रत्येक ठिकाणी ओरडून सांगत होते, विव्हळत होते, रडत होते. मात्र, सामूहिक बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लीप बनविणारे आरोपी म्हणून त्यांच्या माथ्यावर जो कलंक लागला होता, तो काही केल्या कुणाच्या मनात त्यांच्याविषयी कणव निर्माण होऊ देत नव्हता. जे केलेच नाही, त्याची शिक्षा भोगत ते कारागृहाच्या भेसूर भिंतींना रात्रीच्या गर्द अंधारात आपल्या निर्दोषत्वाची कथा अन् व्यथा सांगत होते. या भिंतीनाच त्यांची दया आली की काय, तीन आठवड्यांपूर्वी त्यांना ध्यानीमनी नसताना सुखद धक्का बसला. न्यायालयाचा एक आदेश कारागृह प्रशासनाला मिळाला. या आदेशानुसार त्यांची कारागृहातून सुटका झाली. ते कारागृहाबाहेर आले मात्र आज ते उद्ध्वस्त आयुष्याची सल घेऊन जगत आहेत.