‘त्यांनी’ जीव मुठीत घेऊन काढली रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:08 AM2021-07-25T04:08:05+5:302021-07-25T04:08:05+5:30
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने नदीला आलेल्या पुरात शेतातील घराला वेढा घातल्याने, एका कुटुंबातील तिघांना ...
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने नदीला आलेल्या पुरात शेतातील घराला वेढा घातल्याने, एका कुटुंबातील तिघांना जीव मुठीत घेऊन रात्र काढावी लागली. झुनकी शिवारात घडलेल्या या घटनेतील कुटुंबांना शुक्रवारी सकाळी सहा वाजता सुखरूप योग्य स्थळी हलविण्यात आले.
कळमेश्वर-काटोल मार्गावरून वाहत असलेली खडक नदी पुढे वरोडा येथील नदीला मिळते व समोर हीच नदी झुनकी गावापासून गेली आहे. या नदीच्या काठावर कळमेश्वर येथील शेतकरी चव्हाण यांचे शेत आहे. या शेताची मशागत व देखभाल करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून ज्ञानेश्वर खोपसे, नीलम खोपसे व मुलगा नक्ष हे कुटुंब शेतातच राहतात. त्यांच्या निवासाची सोय म्हणून शेतातच सिमेंट काँक्रिटचे घर बांधण्यात आले आहे. हे घर नाल्याशेजारी असून येथेच जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीआरएस फंडातून सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे.
गुरुवारी आलेल्या पुरामुळे या बंधाऱ्यावरून पाणी फेकल्यामुळे दोन्ही साईटच्या कडा वाहून गेल्या. तर यावर्षीचा आलेला पूर हा दरवर्षीपेक्षा अधिक असल्याने शेतातूनसुद्धा पुराचे पाणी वाहू लागले. यामुळे शेतातील घराला पुराचा वेढा निर्माण झाला. या कुटुंबाला वाचविण्यासाठी शासनाच्या रेस्क्यू टीमचे जवान बोलाविण्यात आले होते. परंतु पुरामुळे रात्री ऑपरेशन राबविणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. पण त्या कुटुंबाने मदतीच्या आशेवर जीव मुठीत घेऊन रात्र शेतातच काढली.
शुक्रवारी पहाटे पाच वाजता मंडळ अधिकारी नीलेश केचे, तलाठी सूरज सादतकर, गोविंद टेकाळे आदींनी शेतात जाऊन त्यांना सुखरूप स्थळी हलविले. पुराच्या पाण्याने नदीकाठावरील शेतीचा बांध फुटला असता तर घरासहित कुटुंबही वाहून जाण्याची शक्यता होती.
---
झुनकी शिवारातील नदीवरील बंधारा व चव्हाण यांचे शेतातील घर.