‘ते’ सेंट्रिंग तारेला करंट देऊन करायचे वन्यप्राण्यांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2023 07:59 PM2023-02-28T19:59:23+5:302023-02-28T20:00:14+5:30
Nagpur News बांधकामासाठी वापरली जाणारी सेंट्रिंग तार टाकून महावितरणच्या हायव्हाेल्टेज विद्युत लाइनवरून विद्युत प्रवाह साेडून वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या चार आराेपींना वनविभागाने अटक केली आहे.
नागपूर : बांधकामासाठी वापरली जाणारी सेंट्रिंग तार टाकून महावितरणच्या हायव्हाेल्टेज विद्युत लाइनवरून विद्युत प्रवाह साेडून वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या चार आराेपींना वनविभागाने अटक केली आहे. या आराेपींना मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्याच्या साैंसर तालुक्यातील चकारा या गावातून अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, खापा वनक्षेत्राअंतर्गत नागलवाडी वनवर्तुळांमध्ये वनमजुरांसह गस्तीवर असताना एफडीसीएमच्या हद्दीत बिचवा गावालगत महावितरणच्या ११ केव्ही विद्युत लाइनवर सेंट्रिंग तार टाकून वन्यप्राण्यांची शिकार हाेत असल्याचा प्रकार वनरक्षक पंकज लामसे यांना आढळला. याप्रकरणी गस्त करून घटनास्थळावरून एका आराेपीस अटक करण्यात आली. वनकाेठडीत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य प्रदेशच्या चकारा गावी धाड टाकून ३ आराेपींना ताब्यात घेण्यात आले. सेंट्रिंग तार टाकून वन्यप्राण्यांची शिकार करण्यात आराेपींचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डाॅ. भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात वर्तुळ अधिकारी एस. सी. कटरे, खापा वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले, सहायक वनसंरक्षक सुरेंद्र काळे हे प्रकरणाचा तपास करीत आहेत. कारवाईत खापा वर्तुळ अधिकारी अनिल राठाेड, दिनकर टेकाम, पंकज लामसे, वनरक्षक स्वप्नील डाेंगरे, पल्लवी कले, प्रिया भंडारे, नेहा गिरी, अश्विन काकडे, अतुल बाहेकर, गाेरखनाथ डाखाेरे, वाय. बी. गावतुरे, वनमजूर तुकाराम धुर्वे, बंडू साेनटक्के यांचा सहभाग हाेता.