जाड भिंगाच्या चष्म्याचा करिअरमध्ये अडथळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:10 AM2021-08-20T04:10:59+5:302021-08-20T04:10:59+5:30
नागपूर : जाड भिंगाचा चष्मा हा अनेकांच्या करिअरमधील अडथळ्याचे कारण ठरते, एवढेच नव्हे तर मुलीच्या लग्नाच्या वेळी जर मुलीला ...
नागपूर : जाड भिंगाचा चष्मा हा अनेकांच्या करिअरमधील अडथळ्याचे कारण ठरते, एवढेच नव्हे तर मुलीच्या लग्नाच्या वेळी जर मुलीला चष्मा असेल तर अनेकदा पसंती येऊनही नकार दिला जातो. यामुळे चष्म्यातून सुटका करून घेण्यासाठी मेडिकलचा नेत्ररोग विभागातील ‘लॅसिक लेझर’ शस्त्रक्रिया कमी वेळातच प्रसिद्धीच्या झोतात आली. परंतु तब्बल ११ महिन्यांपासून हे यंत्र बंद पडले आहे. विशेषत: युवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
‘लॅसिक लेझर’ शस्त्रक्रियेसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये मोठी रक्कम मोजावी लागते. शासकीय रुग्णालयामधील केवळ मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात ही सोय उपलब्ध आहे. यामुळे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी या शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला. तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना शस्त्रक्रियेची निकड व महत्त्व लक्षात आणून दिल्यावर त्यांनी ‘इनोव्हेशन टेक्नॉलॉजी’ या विशेष निधीतून चार कोटी रुपये दिले. परंतु उपकरण खरेदीची प्रक्रिया रखडली. यामुळे २०१८ मध्ये हे उपकरण नेत्ररोग विभागात स्थापन झाले. वर्षभरातच ५००वर शस्त्रक्रिया झाल्या. यात ९० टक्के तरुण-तरुणींचा समावेश होता. याची लोकप्रियता विदर्भच नाही तर आजूबाजूच्या राज्यात पसरली. रुग्णांची गर्दीही वाढली. परंतु कोरोनाची पहिली लाट सुरू होताच शस्त्रक्रिया बंद करण्यात आली. ही लाट ओसरल्यानंतर शस्त्रक्रियेला सुरुवात झाली नाही तोच उपकरणाला लागणारा ‘ऑप्टिक’ नावाचा पार्ट खराब झाला. परंतु उपकरणाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंपनीचा जुना निधी थकीत आहे. जोपर्यंत तो मिळणार नाही तोपर्यंत दुरुस्ती होणार नाही, यावर ते अडून असल्याची माहिती आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्यापासून हे यंत्र बंद पडले आहे.
- विना चिरा, वेदनारहित शस्त्रक्रिया
‘लॅसिक लेझर’ या उपकरणाला ‘लेझर इन सीतू केरॅटोमीलेयुसीस’ असेही म्हटले जाते. डोळ्याच्या बुबुळाच्या मध्यभागातील जाडी साधारण ‘.५’ मिलीमीटर वाढलेली असल्यास त्यात एक नंबर कमी करण्यासाठी १०-१२ मायक्रॉनपर्यंत ही जाडी कमी केली जाते. ही सर्व प्रक्रिया ‘लेझर’द्वारे होते. या शस्त्रक्रियेत रुग्णाला इंजेक्शन दिले जात नाही किंवा चिराही लावला जात नाही. वेदनारहित ही १०० टक्के यशस्वी शस्त्रक्रिया आहे. मेडिकलच्या नेत्ररोग विभागात आतापर्यंत १९ ते ३७ वयोगटातील तरुण-तरुणींवर याच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यातही तरुणींची संख्या अधिक आहे.
- यंत्र सुरू करण्याचा प्रयत्न
लॅसिक लेझर उपकरणाचा ‘ऑप्टिक’ पार्ट खराब झाल्याने ते बंद पडले आहे. संबंधित कंपनीला याची माहिती दिली आहे. कंपनीचा यंत्र देखभाल व दुरुस्तीचा जुना निधी थकल्याने थोडा वेळ लागत आहे. परंतु यातून मार्ग काढीत लवकरच हे यंत्र रुग्णसेवेत सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. राजेश जोशी, प्रमुख, नेत्ररोग विभाग मेडिकल