‘ड्रोन’ने पकडले रेती चोर

By admin | Published: July 22, 2016 03:02 AM2016-07-22T03:02:42+5:302016-07-22T03:02:42+5:30

जिल्ह्यातील रेतीघाटांमधून अवैधपणे उत्खनन शोधण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर करण्यात आला आहे.

The 'thief' caught by a drone | ‘ड्रोन’ने पकडले रेती चोर

‘ड्रोन’ने पकडले रेती चोर

Next

अवैध उत्खनन : चार रेतीघाटांचे करार रद्द
नागपूर : जिल्ह्यातील रेतीघाटांमधून अवैधपणे उत्खनन शोधण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर करण्यात आला आहे. याचे परिणाम आता दिसून आले आहेत. ड्रोनने जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील चार रेतीघाटांमधून अवैध उत्खनन होत असल्याचे शोधून काढले आहे. त्यामुळे संबंधित
रेतीघाटांमधील करारनामा रद्दबातल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी जमा केलेली अनामत रक्कमसुद्धा जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहेत.
जिल्ह्यातील रेतीघाटांमधून फार पूर्वीपासूनच अवैधपणे रेतीचे उत्खनन होते. परंतु मनुष्यबळाची कमतरता आणि स्थानिक स्तरावरील हितसंबंध यामुळे अवैध रेती उत्खनन कधी उजेडातच येत नव्हते. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने याबाबत योग्य उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. अवैध उत्खनन होऊ नये म्हणून रात्रीची गस्त वाढवण्यात आली. स्थानिक स्तरावर कमिटी स्थापन करण्यात आली.
मात्र तरीही प्रभावी परिणाम दिसून आला नाही. अखेर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पुढाकार घेत अवैध उत्खनन रोखण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर करण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांपूर्वी त्याचा वापर सुरू झाला.
जिल्ह्यातील रेतीघाटांमधून अटी व शर्तीनुसार उत्खनन होते किंवा नाही, हे पाहण्यासाठी ‘ड्रोन’ यंत्राद्वारे हवाई सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये मौजा टेंभूरडोह अ व ब (सावनेर), रामडोंगरी-क (सावनेर), माथनी (मौदा) आणि साहोली (पारशिवनी) या रेतीघाटांमधून लिलावधारकाद्वारे पोकलँड मशीनने रेतीचे उत्खनन होत असताना ड्रोनद्वारे प्राप्त व्हिडिओद्वारे दिसून आले. त्या अनुषंगाने संबंधित लिलावधारकास नियमानुसार सुनावणीची संधी देण्यात आली. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. परंतु त्यांनी सादर केलेले स्पष्टीकरण आणि प्रत्यक्षात प्राप्त व्हिडिओमध्ये पोकलँड मशीनचा वापर करून उत्खनन केल्याचे दिसून येत असल्याने, संबंधित रेतीघाटांचा करारनामा रद्दबातल करण्यात आला. (प्रतिनिधी)

जलयुक्त शिवारच्या कामातही ड्रोन
नागपूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची जी कामे झाली आहेत त्याचे व्हिडिओ सध्या देशभरात गाजत आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत सर्वांनीच या कामाचे कौतुक केले आहे. परंतु या जलयुक्त शिवारच्या कामाचे हवाई चित्रीकरण ड्रेनद्वारेच करण्यात आले होते, हे विशेष.

 

Web Title: The 'thief' caught by a drone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.