मोबाईल परत करतो पण... चोराच्या 'या' नव्या डिमांडमुळे पोलीसही चक्रावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 11:29 AM2022-04-11T11:29:22+5:302022-04-11T11:32:45+5:30
त्याला गाढ झोप लागल्याचे पाहून अज्ञात आरोपीने त्याचा १३ हजार रुपये किमतीचा मोबाइल पळविला.
नागपूर : एनडीएची परीक्षा देण्यासाठी आलेल्या आणि रेल्वेस्थानकावर झोपलेल्या एका उमेदवाराचा मोबाइल अज्ञात आरोपीने पळविला. मोबाइलवर कॉल केला असता चोरट्याने फोन उचलला आणि मोबाइल परत देतो; पण दोन हजार रुपये फोन पे कर आणि फोन पेचा पासवर्ड सांग, अशी अट घातल्याने त्या उमेदवारासह पोलीसही चक्रावले.
शरद वानखेडे हा १७ वर्षांचा युवक वाशिम येथून एनडीएची परीक्षा देण्यासाठी ९ एप्रिलला नागपुरात आला. रविवारी १० एप्रिलला परीक्षा असल्यामुळे आणि नागपुरात राहण्याची सोय नसल्यामुळे तो आपल्या मित्रांसह रेल्वेस्थानकावर झोपी गेला. त्याला गाढ झोप लागल्याचे पाहून अज्ञात आरोपीने त्याचा १३ हजार रुपये किमतीचा मोबाइल पळविला.
रविवारी त्या विद्यार्थ्याने परीक्षा दिल्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून मोबाइल चोरीची फिर्याद नोंदविली. तेवढ्यात त्याने आपल्या चोरी गेलेल्या मोबाइलवर कॉल केला असता चोरट्याने कॉल उचलला. त्याने तुला मोबाइल पाहिजे असल्यास मला दोन हजार रुपये तुझ्याच मोबाइलवर फोन पे कर आणि फोन पेचा पासवर्ड सांग, अशी बतावणी केली. चोरट्याच्या या डिमांडमुळे लोहमार्ग ठाण्यातील पोलीसही चक्रावले. त्यानंतर काही वेळाने चोरट्याने मोबाइल स्विच ऑफ करून टाकला. अखेर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.