चोरट्याने केली महानगरांत जीवाची मुंबई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 11:29 AM2020-03-07T11:29:18+5:302020-03-07T11:29:46+5:30
मालकाचा विश्वासघात करून साडेआठ लाख रुपये चोरून नेणाऱ्या चोरट्याने आधी स्वत:वर उपचार करून घेतले. प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर त्याने वेगवेगळ्या महानगरांत जाऊन जीवाची मुंबई केली.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मालकाचा विश्वासघात करून साडेआठ लाख रुपये चोरून नेणाऱ्या चोरट्याने आधी स्वत:वर उपचार करून घेतले. प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर त्याने वेगवेगळ्या महानगरांत जाऊन जीवाची मुंबई केली. सोने, दुचाकी विकत घेऊन ऐशोआरामात सहा महिने काढले. आता तो पोलिसांच्या कोठडीत पाहुणचार घेत आहे. गेल्या आठवड्यात गणेशपेठ पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक करून नागपुरात आणलेला आरोपी राजकुमार शांतिलाल गुप्ता ऊर्फ हेमंत शांतिलाल गोयल (वय ५३) याच्या चौकशीतून ही माहिती उघड झाली आहे.
आरोपी गुप्ता ऊर्फ गोयल मूळचा पुण्याच्या रामटेकडी (हडपसर) परिसरातील रहिवासी आहे. येथील हॉटेल व्यावसायिक अफजल अबुबकर मिठ्ठा (वय ४२) यांच्याकडे तो काम करायचा. मिठ्ठा यांचा आरोपीवर खूप विश्वास होता. त्यामुळे मोठे आर्थिक व्यवहारही ते त्याला सोपवायचे. १९ आॅगस्ट २०१९ ला दुपारी १ वाजता मिठ्ठा यांनी गुप्ता ऊर्फ गोयलला ८ लाख ५५ हजाराचा चेक देऊन बँकेतून रक्कम आणायला सांगितले. दुपारी गेलेला गोयल सायंकाळ होऊनही परत न आल्यामुळे काळजीत पडलेल्या मिठ्ठा यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. साडेआठ लाखांची रोकड घेऊन बेपत्ता झालेल्या गोयलचा मोबाईल बंद होता. त्याचे अपहरण झाले असावे, अशीही शंका आली. त्यामुळे पोलिसही हादरले. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी बरीच धावाधाव केली. मात्र, तो काही हाती लागला नाही.
पोलीस इकडे त्याचा शोध घेत होते तर गुप्ता सरळ पुण्याला पोहचला होता. त्याला हायड्रोसिल अन् जबड्याचे दुखणे होते. त्यावर त्याने खासगीत उपचार करून घेतले. प्रकृती चांगली झाल्यानंतर त्याने सोनसाखळी, अंगठी विकत घेतली. नंतर इंदूर गाठले. तेथे अनेक दिवस ऐशोआराम केला. तेथून जबलपूरला पोहचला. तेथेही जीवाची मुंबई करून घेतली. नंतर उत्तरप्रदेशात पोहचला. लखनौचा नवाबी पाहुणचार घेतल्यानंतर जवळच्या राजाजीपुरम (तालकटोरा) येथे त्याने बस्तान बसविले. तेथेच त्याने बनावट आधारकार्ड तयार करून मोटरसायकलही विकत घेतली.
प्रशंसनीय तपास !
वाढत्या तक्रारी आणि गुन्हे यामुळे बºयाच गुन्ह्यांच्या तपासावरून एक-दीड महिन्यानंतर पोलिसांची नजर हटते. ते मागे पडलेल्या गुन्ह्यांना मागे ठेवून त्यापेक्षा मोठ्या गुन्ह्यांच्या तपासाला प्राधान्य देतात. मात्र, या प्रकरणाच्या तपासावर पोलिसांनी आपली नजर होती तशीच रोखून ठेवली. त्याच्या बँक खात्यावरही पोलिसांचे लक्ष होते. अलीकडे त्याच्या खात्यातील रक्कम राजाजीपुरमच्या एटीएममधून वारंवार काढली जात असल्याचे लक्षात येताच गणेशपेठ पोलिसांच्या पथकाने तालकटोरा गाठले. तेथील एटीएमच्या चौकीदाराकडून गोयल-गुप्ताची माहिती काढली अन् अखेर त्याच्या मुसक्या बांधल्या. अनेक गोष्टींसाठी तरसल्यानंतर तब्बल सहा महिने जीवाची मुंबई करायला भेटली. त्यामुळे या गुन्ह्याचा गुप्ता-गोयलला पश्चात्ताप नसल्याचे पोलीस सांगतात.