भर दुपारी घरात शिरून वृद्धेचा गळा दाबला, दीड तोळ्याची चेन लुटली
By योगेश पांडे | Published: September 14, 2023 05:10 PM2023-09-14T17:10:28+5:302023-09-14T17:12:19+5:30
वस्तीतील नागरिकाचेच कृत्य : घरात लोक असताना पोहोचला पहिल्या मजल्यावर
नागपूर : वामकुक्षीसाठी घराच्या पहिल्या मजल्यावर पहुडलेल्या ७० वर्षीय महिलेच्या खोलीत शिरून एका चोरट्याने अगोदर त्यांचा गळा दाबला व धमकी देत त्यांच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याची चेन लुटली. किरायाने राहणाऱ्या महिलेने आरोपीला पाहिल्यामुळे तो पोलिसांच्या तावडीत आला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सिताबर्डीतील सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्यालादेखील अशाच प्रकारे लुटण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे.
अरुणा मधुकर व्यवहारे (७०, रडके ले आऊट, बालाजीनगर, हिंगणा रोड) या त्यांचा मुलगा, सून व नातवांसोबत राहतात. बुधवारी दुपारच्या सुमारास त्या पहिल्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या. त्यांच्या घरी महालक्ष्मी असतात व त्याची तयारी करण्यासाठी सून पहिल्या मजल्यावरच होती. तिने अरुणा यांच्या खोलीचा दरवाजा लोटला व ती महिलांसोबत तळमजल्यावर धान्य निवडत होती. अचानक तोंडाला स्कार्फ गुंडाळलेला एक आरोपी अरुणा यांच्या खोलीचा दरवाजा उघडून आत आला व त्याने त्यांचा गळाच दाबला.
त्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याची चेन ओढली व ओरडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो पळाला. त्याचवेळी अरुणा ओरडल्या. त्यांच्या घरी किरायाने राहणाऱ्या कविता बोबडे यांनी आवाज ऐकला व त्यांना एक व्यक्ती पळताना दिसला. तो परिसरातच राहणार गौतम रामदास उंदीरवाडे (४४, बालाजीनगर) हा असल्याचे त्यांनी ओळखले. या प्रकाराची एमआयडीसी पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलिसांनी अरुणा यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.