सराफा दुकान फोडण्यासाठी चोरट्याने शोधला झाडावरून मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 08:47 PM2020-08-01T20:47:37+5:302020-08-01T20:51:35+5:30
गुन्हा करण्यासाठी गुन्हेगार कोणता मार्ग शोधतील त्याचा नेम नाही. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी चक्क उंच झाडालाच आपला मार्ग बनविला. झाडावरून चढून चोरट्याने सराफा दुकान फोडले आणि रोख तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हा करण्यासाठी गुन्हेगार कोणता मार्ग शोधतील त्याचा नेम नाही. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी चक्क उंच झाडालाच आपला मार्ग बनविला. झाडावरून चढून चोरट्याने सराफा दुकान फोडले आणि रोख तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
इतवारीतील रहिवासी सूरज संजय अरमरकर यांचे पारडी येथे महाभवानी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे.
ज्या इमारतीत हे दुकान आहे, त्या इमारतीच्या बाजूला मोठे कडुनिंबाचे झाड आहे. मध्यरात्रीनंतर चोरटा त्या झाडावरून चढून इमारतीच्या टेरेसवर आला. तेथून त्याने ग्रीलची कडी तोडली आणि किचनमध्ये शिरला. किचनचे कुलूप तोडून सराफा दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील रोख २० हजार तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ८७ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला.
शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अरमरकर यांनी पारडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही बघितले असता चोरटा सराफा दुकानात कसा शिरला त्याचा उलगडा झाला आणि काही वेळासाठी पोलिसांनीही तोंडात बोटे टाकली. दरम्यान, अरमरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.