-अन् चोरट्याने तिजोरीच उचलून नेली; नागपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 10:29 AM2019-09-27T10:29:00+5:302019-09-27T10:30:25+5:30
नागपुरातील माऊंट रोडवर असलेल्या एलबी हॉटेलमध्ये बुधवारी पहाटे घडलेल्या सिनेस्टाईल चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हॉटेलच्या उघड्या शटरमधून आत शिरून एका चोरट्याने आतमधील नोटांनी खचाखच भरलेली तिजोरीच चोरून नेली. तिजोरीत १० लाख ४४ हजार रुपये होते. सदरमधील माऊंट रोडवर असलेल्या एलबी हॉटेलमध्ये बुधवारी पहाटे घडलेल्या या सिनेस्टाईल चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रवीण शामराव धार्मिक (वय ३१, रा. जागनाथ बुधवारी) हे सदरमध्ये एलबी हॉटेल-२ मध्ये व्यवस्थापक आहेत. बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत येथे ग्राहक होते. ते गेल्यानंतर प्रवीण धार्मिकही निघून गेले. पहाटे ४ वाजता शटरचे हॉटेल उघडे असल्याची संधी साधून एक चोरटा आत शिरला. तो आरामशीर हॉटेलमध्ये गेला. त्याने बाहेर आणि आतमध्ये असलेल्या सीसीटीव्हीचे कनेक्शन बंद केले. त्यानंतर आतमध्ये (स्टोअर रूममध्ये) असलेल्या गोदरेजच्या इलेक्ट्रीक तिजोरीला उचलून १० मिनिटात चोरटा बाहेर आला. तेथून अंधाराचा फायदा उठवत पळून गेला. तिजोरीत १० लाख ४४ हजार ४६८ रुपये होते. सकाळी ११ वाजता हॉटेल मालक नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये आले. त्यांना नियोजित जागी तिजोरी दिसली नाही म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली. कुणीच काही माहिती नसल्याचे सांगितल्याने पोलिसांना बोलविले. त्यानंतर या चोरीच्या घटनेचा बोभाटा झाला.
विशेष म्हणजे, ज्यावेळी हॉटेलमध्ये चोरी झाली त्यावेळी हॉटेलचा सिक्युरिटी गार्ड शटरजवळ झोपून होता. आतमधील वेटर, कर्मचारी वरच्या माळ्यावर झोपले होते. त्यामुळे चोरट्याला अवघ्या १० मिनिटात साडेदहा लाख रुपये चोरणे सहज शक्य झाले.
चोरटा नेहमीच्या संपर्कातील!
पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर तपासला असता त्यात चोरटा आरामशीर येताना आणि अवघ्या १० मिनिटात नोटांनी भरलेली तिजोरी घेऊन जाताना दिसला. त्याची एकूणच देहबोली लक्षात घेता तो या हॉटेलमध्ये नेहमीच येत असल्याचा आणि त्याला हॉटेलच्या आत-बाहेरची सर्वच माहिती असल्याचा अंदाज पोलिसांनी काढला. अर्थात चोरटा हॉटेलच्या संपर्कातीलच कुणी असावा, असा पोलिसांचा कयास आहे. या चोरीचा आम्ही लवकरच छडा लावू, असा विश्वास सदरचे ठाणेदार महेश बनसोडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.