हा चोर तुमच्या सोसायटीत तर आला नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:45 AM2017-11-13T00:45:10+5:302017-11-13T00:45:29+5:30
पॉश सोसायट्यात दुपारी रेकी करायची आणि रात्री हात साफ करायचा, अशी टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. उच्चभ्रू नागरिकासारखे वर्तन करीत या टोळीचा एक सदस्य दुपारी पॉश सोसायट्यात प्रवेश करतो,
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पॉश सोसायट्यात दुपारी रेकी करायची आणि रात्री हात साफ करायचा, अशी टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. उच्चभ्रू नागरिकासारखे वर्तन करीत या टोळीचा एक सदस्य दुपारी पॉश सोसायट्यात प्रवेश करतो, तिथील रेकी झाल्यानंतर टोळीला पुढच्या कामासाठी हिरवी झेंडी दाखवितो, असा धक्कादायक प्रकार गोकुल हाऊसिंग सोसायटी (बोरगाव) परिसरात उजेडात आला आहे. या परिसरातील काही सतर्क नागरिकांनी या चोरट्याचे फोटो सीसीटीव्हीत कैद केले आहेत.
गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोरगाव परिसरात गोकुल हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीत अंदाजे २५ हून फ्लॅट स्कीम आहेत. तर काही नव्या इमारतींचे बांधकामही सुरू आहे. त्यामुळे या परिसरात वर्दळ वाढली आहे. या संधीचा फायदा घेत चोरट्याची एक टोळीही या परिसरात सक्रिय झाली आहे. या सोसायटीतील लियो गॅलक्सीमध्ये दिवाळीत चोरट्यांनी हात साफ केला. गत वर्षभरापासून गोकुलमधील अनेक फ्लॅट स्कीममध्ये चोरीच्या घटना घटत आहेत. शनिवारी ‘अल्पाईन मिडोज’ या बिल्डींगमध्ये या टोळीतील सदस्याने दुुपारी ४.३० वाजता रेकी केली आणि एका फ्लॅट समोरील महागड्या वस्तू पळविल्या. मात्र चोरट्यावर पाळत ठेवून असलेल्या काही नागरिकांनी त्याचे हे कृत्य सीसीटीव्हीत कैद केले आहे.
या गोकुल हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅट स्कीमधील फ्लॅट मूळ मालकांनी भाड्याने दिले आहेत. यातील किती फ्लॅट मालकांनी भाडेकरुंची माहिती पोलिसांना दिली आहे, हाही एक संशोधनाचा विषय आहे. भाडेकरूंच्या वाढत्या संख्येने या परिसरात बाहेरच्या नागरिकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका मात्र स्थानिक नागरिकांना बसतो आहे. यातच गोकुल हाऊसिंग सोसायटीचा काही परिसर गोरेवाडा रोडवर येतो.
या रोडवरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रेकी करणाºया चोरट्यांचे रात्री या परिसरात फावते. त्यामुळे या भागात दुपारी आणि रात्री पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.