स्टेशनवर चोरी करून रेल्वेतून पळताना बिहारचा चोरटा जेरबंद

By नरेश डोंगरे | Published: June 8, 2024 09:40 PM2024-06-08T21:40:54+5:302024-06-08T21:41:14+5:30

सुपरफास्टने गाडी पकडली, आरपीएफने पकडून नागपुरात आणले

Thief of Bihar jailed for stealing from the station and escaping from the train at Nagpur | स्टेशनवर चोरी करून रेल्वेतून पळताना बिहारचा चोरटा जेरबंद

स्टेशनवर चोरी करून रेल्वेतून पळताना बिहारचा चोरटा जेरबंद

नागपूर : बिहारमधून आलेल्या एका चोरट्याने नागपूर रेल्वेस्थानकावर एक महागडा मोबाईल चोरला. त्यानंतर तो दुसरे सावज शोधण्यासाठी पटना सुपरफास्टने ईटारसीकडे निघाला. मात्र, चोरीची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कमालीची सतर्कता दाखवली अन् चोरट्याला धावत्या ट्रेनमध्ये मध्य प्रदेशात अटक केली.

नितीशकुमार राजो यादव (वय २०) असे या भामट्याचे नाव असून, तो पटना (बिहार) जिल्ह्यातील गोसाई, धनक डोभ येथील रहिवासी आहे. गुन्हेगारी वृत्तीचा यादव ३ जूनला नागपुरात आला. दुपारी १ च्या सुमारास त्याने संधी मिळताच फूड स्टॉलजवळ एका प्रवाशाचा २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. त्यानंतर ट्रेन नंबर २२६६९ पटना सुपर फास्ट एक्स्प्रेसमध्ये लगबगीने बसून निघून गेला. दरम्यान, मोबाईल चोरीला गेल्याचे कळताच संबंधित प्रवाशाने रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर जीआरपीकडून आरपीएफला माहिती कळताच लगेच स्टॉलजवळचे सीसीटीव्ही मोबाईल तपासण्यात आले.

संशयित व्यक्ती लगबगीने पटना एक्स्प्रेसमध्ये शिरत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. त्यामुळे आरपीएफच्या अधिकाऱ्याने लगेच या गाडीतील आरपीएफच्या जवानांना अलर्ट देऊन संशयिताचे फुटेज मोबाईलवर पाठवले. त्यावरून धावत्या गाडीत बैतुल (मध्य प्रदेश) जवळ आरपीएफने आरोपी यादवच्या मुसक्या बांधल्या. त्याची झडती घेतली असता तक्रारदाराने दिलेल्या वर्णनाचा मोबाईल यादवजवळ आढळला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आरोपी यादवला नागपुरात आणण्यात आले. चाैकशीनंतर त्याला जीआरपीच्या स्वाधीन करण्यात आले. रेल्वे पोलिसांच्या चाैकशीत हा मोबाईल नागपूर स्थानकावरून चोरल्याचे यादवने कबूल केले. त्यामुळे त्याला चोरीच्या आरोपात अटक करण्यात आली. त्याने असेच अनेक गुन्हे केले असावेत, असा संशय असून, पोलिस त्याची चाैकशी करीत आहेत.

Web Title: Thief of Bihar jailed for stealing from the station and escaping from the train at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.