चोर म्हणाला... साहेब सीसीटीव्हीच बंद आहेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:06 AM2021-07-22T04:06:41+5:302021-07-22T04:06:41+5:30
नागपूर : चोरीच्या एका गुन्ह्यात लोहमार्ग पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याने केलेली चोरी सीसीटीव्हीत कैद झाल्याचे लोहमार्ग ...
नागपूर : चोरीच्या एका गुन्ह्यात लोहमार्ग पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याने केलेली चोरी सीसीटीव्हीत कैद झाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी त्या चोराला सांगितले. परंतु साहेब सीसीटीव्हीच बंद आहे मग घटना सीसीटीव्हीत कशी कैद होईल, असे चोरटा म्हणाला अन् पोलीसही बुचकाळ्यात पडले. इतवारी रेल्वेस्थानकावरील २३ पैकी १५ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले असून सराईत चोरट्यांनाही ही बाब माहीत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इतवारी रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून विकास कामे सुरू आहेत. फूट ओव्हर ब्रिजच्या कामासाठी तोडफोड करण्यात आली. यामुळे केबल क्षतिग्रस्त होऊन १५ कॅमेरे बंद पडले आहेत. अलिकडेच गोंदियाचे पोलीस एका चोरी प्रकरणाच्या तपासासंदर्भात इतवारी रेल्वे स्थानकावर आले. मात्र, सीसीटीव्हीच बंद असल्याने त्यांना आल्या पावलीच परतावे लागले. रेल्वे प्रशासनानुसार हा विषय सुरक्षा दलाशी संबधित आहे. तर आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्या सीसीटीव्ही यंत्रणा स्टेशन मास्तरांच्या अंतर्गत असल्याचा दावा केला. अलिकडे इतवारी स्थानकावरील आरपीएफ ठाण्यासमोरच असलेल्या कॅन्टीनमध्ये चोरी झाली होती. काही दिवसातच पुन्हा स्टेशन परिसरात चाकूच्या धाकावर प्रवाशाला लुटण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींना अटक केली. परंतु सीसीटीव्ही बंद असल्यामुळे आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना अडथळे येत आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही त्वरित सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
............