शर्ट खराब झाल्याची बतावणी करीत व्यापाऱ्याचे ८.२० लाख रुपये पळवले; काटाेल शहरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 02:29 PM2022-03-09T14:29:37+5:302022-03-09T14:37:04+5:30
अनाेळखी तरुणाने त्यांना त्यांचा शर्ट खराब झाल्याची बतावणी केली. शर्ट नेमके कुठे खराब झाले हे बघण्यासाठी त्यांनी हातातील पिशवी खाली ठेवली. त्याचवेळी त्यांचे लक्ष नसताना त्या चाेरट्याने ती पिशवी घेऊन पाेबारा केला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल (नागपूर) : गुरांच्या खरेदी-विक्रीसाठी काटाेल शहरात आलेल्या व्यापाऱ्याला एकाने शर्ट खराब झाल्याची बतावणी केली. व्यापारी शर्ट साफ करीत असताना त्याने व्यापाऱ्याकडील पिशवी लंपास केली. त्या पिशवीत ८ लाख २० हजार रुपये असल्याची माहिती व्यापाऱ्याने पाेलिसांना दिली. ही घटना काटाेल शहरातील गुरांच्या बाजारात मंगळवारी (दि. ८) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली.
शेख अयुब शेख युसूफ (रा. पेठपुरा, मोर्शी, जिल्हा अमरावती) हे गुरे खरेदी व विक्रीचा व्यवसाय करतात. गुरांच्या खरेदी व विक्रीसाठी ते नागपूर, माेहपा, वरूड, मोर्शी, अमरावती, कारंजा (घाडगे), पांढुर्णा (मध्य प्रदेश) यासह अन्य ठिकणी भरणाऱ्या गुरांच्या बाजारात जातात. काटाेल शहरात मंगळवारी गुरांचा माेठा बाजार भरत असल्याने ते त्यांच्या मुलगा शाेएबसह सकाळी शहरात आले हाेते. या बाजारात सर्व व्यवहार राेख रकमेत हाेत असल्याने त्यांनी माेठी रक्कम साेबत आणली हाेती.
दरम्यान, सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास त्यांचे अंग खाजवायला सुरुवात झाली. त्यामुळे ते अंगावर पाणी घेण्यासाठी जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेले. त्याचवेळी अनाेळखी तरुणाने त्यांना त्यांचा शर्ट खराब झाल्याची बतावणी केली. शर्ट नेमके कुठे खराब झाले हे बघण्यासाठी त्यांनी हातातील पिशवी खाली ठेवली. त्याचवेळी त्यांचे लक्ष नसताना त्या चाेरट्याने ती पिशवी घेऊन पाेबारा केला. ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. ताेपर्यंत चाेरटा दूरवर पळून गेला हाेता. त्या पिशवीत एकूण ८ लाख २० हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.